मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पुरस्कार घ्यायला गेल्या 10 वर्षांपासून वेळ मिळालेला नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेचा सचिन तेंडुलकरसाठी जाहीर झालेला नागरी सन्मान पुरस्काराचा प्रस्ताव रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली आहे.


2005 साली महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत कसोटी शतकांचा विक्रम करणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुंबईकर म्हणून महापालिकेकडून नागरी सत्कार करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र सचिन तेंडुलकरकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर पालिकेवर नागरी सत्कार प्रस्ताव मागे घेण्याची वेळ आली आहे. 2010 साली क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा नागरी सत्कार करण्याचा प्रस्ताव सभागृहात मंजूर झाला होता. त्यानंतर दहा वर्षे हा प्रस्ताव सचिन तेंडुलकर यांनी न दिलेल्या प्रतिसादामुळे पडून राहिला. पुरस्कारासाठी वेळोवेळी पाठवलेल्या पत्रांना सचिन तेंडुलकरने अपेक्षित प्रतिसाद दिला नाही.

मुंबई महापालिकेकडून 11 डिसेंबर 2011 ही नागरी सत्काराची तारीखही निश्चित करण्यात आली. मात्र, तेव्हाही सचिनकडून प्रतिसाद मिळाला नाही. सचिन तेंडुलकरकडून पालिकेच्या पत्रांना प्रतिसाद न दिल्याने आणि दरम्यानच्या काळात सचिनने निवृत्ती स्वीकारल्याने आता पालिका प्रशासनाने त्याच्यासमोर हात टेकत अखेर हा सत्काराचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

जगभरात आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर एकापेक्षा एक विक्रम क्रिकेटमध्ये रचणाऱ्या सचिनला इतर पुरस्कारांसोबतच देशाचा सर्वोच्च भारतरत्न हा सन्मानही प्राप्त आहे. मात्र, मुंबईकर असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुंबई महापालिकेतर्फे जाहीर नागरी सत्कार करण्याचा निर्णय सचिनच्या प्रतिसादाच्या अभावामुळे अखेरीस रद्द करावा लागला आहे.