मुंबई : मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने काल 24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर  आज म्हणजे 25 जुलैला मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे.

दादरमधील राजर्षी शाहू सभागृहात काल मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड बंदची हाक देण्यात आली आहे. आजच्या बंदमध्ये कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, तोडफोड होणार नाही, असं आश्वासन आयोजकांनी दिलं आहे.

या बंदमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, तसेच याला हिंसक वळण लागू नये, यासाठी सकल मराठा मोर्चाकडून आंदोलकांसाठी आचारसंहिता घालून देण्यात आली आहे. याबाबतचा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

काय आहे आचारसंहिता?

  1. मराठा तरुणांनी सदर बंद शांततापूर्ण वातावरणात पार पाडायचा आहे. आंदोलनात घुसून तोडफोड करणाऱ्या प्रवृत्तीपासून समाजाची बदनामी होणार नाही याबाबत जागरुक राहून बंद यशस्वी पार पाडावा.

  2. मराठा समाजाचा आक्रोश हा सरकारविरोधी आहे. त्याला जातीय रंग देऊ नये.

  3. कोणत्याही प्रकारच्या इतर समाजाच्या भावना दुखावणाऱ्या आणि सामाजिक तेढ निर्माण करण्यापासून स्वतःला आणि इतरांना आवर घालावा.

  4. रुग्णवाहिका आणि अतिमहत्त्वाच्या सेवा देणाऱ्या दवाखाने, मेडिकल यांना बंदसाठी दबाव टाकू नये.

  5. आंदोलनात घोषणा आणि आपला आक्रोश व्यक्त करत असताना अश्लील भाषा आणि अनुचित शिव्या यांचा वापर करू नये.

  6. पोलीस प्रशासनाशी हुज्जत ना घालता त्यांच्याशी समन्वय साधून आंदोलन यशस्वी करावे

  7. इतर समाज बांधवांनी कृपया हे आंदोलन शासनासोबत असल्याने मराठा समाजाला सहकार्य करावे, जेणेकरुण आपल्या सर्वांचे प्रश्न मार्गी लागतील

  8. भडकावू पोस्ट किंवा व्हिडीओ वायरल न करता आपापल्या जिल्ह्यातील समन्वयक मराठा सेवक यांच्याशी संपर्क ठेवून पोलीस प्रशासनाला गैरप्रकार करणाऱ्या लोकांची माहिती द्यावी

  9. कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडून आंदोलन चिघळले जाणार नाही याची दक्षता घ्यावी

  10. पोलीस प्रशासनाने आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न करून वातावरण चिघळू देऊ नये

  11. महिला आणि मुले यांना त्रास होणार नाही किंवा त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी

  12. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अथवा गोंधळ माजेल अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकू नयेत

  13. कोणत्याही प्रकारे या आंदोलनाला राजकीय वळण लागू देऊ नये. आपल्या समस्या सोडवणं सर्वपक्षीय नेत्यांची जबाबदारी होती आणि राहील. आपण आपल्या हक्कासाठी रस्त्यावर आहे, राजकारणासाठी नाही याची जाणीव सर्वांनी ठेवून कृती करावी.


निवेदक : सकल मराठा समाज, मुंबई, मराठा क्रांती मोर्चा, मुंबई

संबंधित बातमी : मुंबई बंद LIVE: मराठा क्रांती मोर्चाकडून आज मुंबई बंद!