वसई : मुंबईतील मालाडमध्ये अपहरण झालेल्या 16 वर्षीय तरुणीची सुटका करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांनी ऑगस्टमध्ये लहान मुलांचं अपहरण करुन विक्री करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला होता. त्यात या 16 वर्षीय मुलीचा समावेश आहे.


2001 मध्ये अवघ्या दहा ते वीस दिवसांच्या बाळाची मालाडमधल्या मालवणीतील अनुराधा हॉस्पिटलमधून चोरी करण्यात आली होती.

दोन महिलांसह पाच जणांना पोलिसांनी बेडया ठोकल्या होत्या. याच टोळीच्या तपासात मिरा रोडमधील एका महिलेकडे 16 वर्षांची मुलगी सापडली. तिच्या आई-वडिलांचा शोध घेतला जात आहे.

मिरा रोड मध्ये राहणाऱ्या आणि व्यवसायाने बारबाला असलेल्या किरण राजनं आपली मयत बहिण सुषमा सिंग आणि मालाडच्या मालवणी येथील अनुराधा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका दायीच्या मदतीने मूल हॉस्पिटलमधून आणलं होतं. मात्र 16 वर्षांनंतर किरणचं बिंग फुटलं. ती तिला वाममार्गाला लावण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती आहे.

कोणाचं बाळ अनुराधा हॉस्पिटलमधून 2001 साली हरवलं असेल, तर त्यांनी तातडीनं ठाणे ग्रामीण पोलिसांशी संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.