Babulnath Temple : मुंबईतील प्राचीन बाबुलनाथ (Mumbai Babulnath Temple)  येथील शिवलिंगाला भेग पडली आहे. बाबुलनाथला अभिषेक करण्यास भाविकांना मंदिर प्रशासनाची मनाई केली आहे. आयआयटी मुंबईच्या (IIT Bombay)  अहवालात शिवलिंगाला भेग असल्याचा अहवाल समोर आला आहे. भेसळयुक्त अबीर, गुलाल, भस्म, कुंकू, चंदन, दूध अर्पण केल्याने शिवलिंगाला भेग पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बाबुलनाथ मंदिरात स्थापित केलेले शिवलिंग बाराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर दक्षिण मुंबईतील मलबार हिलच्या एका छोट्या टेकडीवर वसलेले आहे.


श्री बाबुलनाथ मंदिर धर्मादाय संस्थेचे अध्यक्ष नितीन ठक्कर म्हणाले की, "कोरोना काळापासून मंदिरात दुग्धाभिषेक बंद करण्यात आला आहे. गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून रसायनयुक्त पदार्थांसह विधी केल्याने शिवलिंग खराब होत असल्याचे मंदिराच्या पुजाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यानंतर मंदिर ट्रस्टने आयआयटी बॉम्बेकडून सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला."


मार्चपर्यंत अहवाल येणे अपेक्षित


"आयआयटी बॉम्बेची टीम शिवलिंगाच्या संवर्धनाबाबत सल्ला देणार आहे. मार्चपर्यंत अहवाल येणे अपेक्षित आहे. बाबुलनाथ मंदिरावर मुंबईकरांची श्रद्धा आहे. शिवलिंगाबाबत आम्ही अत्यंत संवेदनशील आहोत आणि ते जतन करण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलण्याच येतील," असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 


पाण्याव्यतिरिक्त अन्य सर्व पदार्थांच्या अभिषेकाला मनाई


बाबुलनाथ हे मुंबईतील प्राचीन मंदिर आहे. प्राचीन जुन्या शिवलिंगासला भेग पडल्यानंतर आयआयटी-बॉम्बेचे तज्ज्ञ एक अहवाल तयार करत आहेत. शिवलिंगावर अभिषेकासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये दूध, पाणी, मध, दही, कुंकू, अबीर, भस्म, गुलाल, चंदन, बेलपत्र आणि इतर अनेक पदार्थ वाहण्यात येतात. बाजारात मिळणारे बरेचसे पदार्थ हे भेसळयुक्त असतात. त्यामुळे ही भेग पडलेली असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता पाण्याव्यतिरिक्त अन्य सर्व पदार्थांच्या अभिषेकाला मनाई करण्यात आली आहे. दर्शनासाठी मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमधून भाविकांनी बाबुलनाथ मंदिरात दर्शन करण्यासाठी येतात. 


बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील सुप्रसिद्ध शिवमंदिर


बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील सुप्रसिद्ध शिवमंदिर असून, राजा भीमदेव यांनी हे मंदिर बाराव्या शतकात बांधले आहे. हे मंदिर काळाच्या ओघात जमीनदोस्त झाले होते, मात्र, 1780 साली मंदिराचे काही अवशेष आढळून आल्याने त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Bhimashankar Jyotirlinga : ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या जागेवर खासगी व्यक्तीचा दावा; चर्चांना उधाण