मुंबई : गारव्याचा आनंद लुटणाऱ्या मुंबईकरांना अचानक वाढलेल्या तापमानाची झळ पोहचायला लागली आहे. शनिवार 18 फेब्रुवारीला मुंबईत 38.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून गेल्या दहा वर्षातलं फेब्रुवारी महिन्यातील हे दुसरं उच्चांकी तापमान आहे.
यापूर्वी 2015 मध्ये 23 फेब्रुवारीलाही 38.8 अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. 2012 मध्ये पारा 39 अंश सेल्सिअस पार करुन गेला होता. गेल्या 50 वर्षांतील फेब्रुवारीमधील सर्वाधिक तापमान पाहिलं तर 1966 मध्ये 39.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
मुंबईमध्ये शनिवारी किमान तापमान 19.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. तर शुक्रवारी कमाल 37.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
सध्या पूर्व दिशेकडून वारे वाहत असून त्यामुळे तापमानात वाढ झाल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे. पुढील काही दिवस हा उष्मा सहन करावा लागण्याची चिन्हं आहेत. पुढील आठवड्याच्या अखेरीस तापमान हळुहळू पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.