मुंबई : व्हॉट्सअॅपवर दहावी-बारावीचे पेपर फुटण्याच्या घटना ताज्या असतानाच राज्य सरकारच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. मुंबईतील दहिसरमध्ये एससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षांच्या तब्बल 516 उत्तरपत्रिका चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


दहिसरमधल्या घरटनपाडा भागातल्या इस्त्रा विद्यालयातून या उत्तरपत्रिका चोरीला गेल्या आहेत. यामध्ये इतिहासाच्या 150, संस्कृतच्या 216 आणि विज्ञानाच्या 150 उत्तरपत्रिकांचा समावेश आहे. या प्रकरणी मुख्याध्यापकांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तपासणीसाठी शाळेत पाठवलेल्या दहावीच्या उत्तरपत्रिका चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. शिक्षकांच्या वादातून हे पेपर चोरीला गेल्याचा दावा केला जात आहे. बोर्डाच्या सूचनेनंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दहिसरमधील इस्रा शाळेकडे बोर्डाने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काही उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पाठवल्या होत्या. या उत्तरपत्रिका मुख्याध्यापक नरेंद्र पाठक यांच्या कार्यालयात ठेवण्यात आल्या होत्या.

मात्र तीन एप्रिल रोजी काही उत्तरपत्रिका गहाळ झाल्याची बाब शाळेच्या निदर्शनास आली. या उत्तरपत्रिका चोरीला गेल्याची शक्यता वर्तवत शाळा प्रशासनाने पाच दिवसांनी पोलिसांत धाव घेत घेतली. शाळेने सुरक्षेच्या दृष्ट‌ीने कोणतीही खबरदारी न घेतल्याने चोरी झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आरोपींचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.