मुंबई: मालाडच्या आक्सा चौपाटीवर मोठी दुर्घटना टळली. एकाच कुटुंबातील 12 जणांना बुडताना वाचवण्यात यश आलंय. मुंबई महानगरपालिकाचे लाईफ गार्ड भारत मानकर आणि त्यांच्या सहा जणांच्या टीमनं या लोकांचा जीव वाचवला.
मुंबईचा मालाडच्या आक्सा चौपाटीवर आज संध्याकाळी 4:30 च्या सुमारास भुसावळमधून एक कुटुंब फिरायला आलं होतं. या एकाच कुटुंबातील 12 लोक समुद्राच्या भरतीमध्ये उतरल्यामुळे बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र आक्सा बीचवर तैनात असलेल्या मुंबई महानगरपालिकाचे लाईफ गार्ड भारत मानकर आणि त्यांची 6 जणांची टीम यावेळी देवदूतासारखी धावून आली. समुद्राच्या भरतीमध्ये 12 लोकांना बुडताना पाहिल्यानंतर या टीमने लगेच समुद्रात उडी मारून सर्व 12 जणांना सुखरूप बाहेर काढलं. लाईफ गार्डनी केलेल्या या 12 जणांचा सुखरूप रेस्क्यूमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
मालवणमध्ये बोटिंगसाठी गेलेली बोट बुडाली; दोघांचा मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी गेलेली बोट बुडाली. 20 पर्यटक घेऊन स्कुबा डायव्हिंग करुन परतीच्या मार्गावर असताना समुद्र किनाऱ्यापासून जवळ बोट आली असता बोट बुडाली. यामध्ये दुर्घटनेट दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जय गजानन नावाची ही बोट आहे.
तारकर्ली येथील जय गजानन नावाची 20 पर्यटकांना घेऊन स्कुबा डायव्हिंगसाठी गेली होती. स्कुबा डायव्हिंग करुन परत येताना आज दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान MTDC रिसॉर्ट इथल्या किनाऱ्यावर आणत असताना बोट बुडाली. यात दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. तर सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. बोटीतील इतर सर्व पर्यटकांना वाचवण्यात यश आलं आहे.