मुंबई : जगात मुंबई विमानतळ सर्वाधिक सुरक्षित आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा देणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाची (सीआयएसएफ) सेवा जगात सर्वोत्कृष्ट असल्याचं ग्लोबल क्वालिटी रेटिंग एजन्सीने म्हटलं आहे.

सीआयएसएफचं प्रवाशांसोबतचं वर्तन, प्रवाशांचं हरवलेलं सामान परत करणं आणि सीआयएसएफच्या सुरक्षेत प्रवाशांना सुरक्षित वाटणं या बाबींचा हा पुरस्कार देताना विचार करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

मुंबई विमानतळावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीआयएसएफला वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसद्वारे विमानतळावर सर्वोत्कृष्ट सुरक्षा पुरवणारी संस्था म्हणून पुरस्कृत करण्यात आलं, अशी माहिती सीआयएसएफचे प्रवक्ते हेमेंद्र सिंह यांनी दिली.

मुंबई विमानतळ भारतातील सर्वाधिक व्यस्त असणारं दुसरं विमानतळ आहे. 21 ऑगस्ट 2002 पासून विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफकडे असून यासाठी 5 हजार पेक्षा अधिक कर्मचारी तैनात असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 2015-16 या वर्षात मुंबई विमानतळावरुन 4.1 कोटी प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला.

राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय विमानतळावरील सीआयएसएफची सुरक्षा अव्वल असल्याचं डब्ल्यूक्यूसीने जुलैमध्ये सांगितलं होतं. तर गेल्या वर्षी विमानतळ सेवा गुणवत्तेमध्ये दिल्ली विमानतळाची सुरक्षा डालास, हिथ्रो, पॅरिस आणि दुबई विमानतळांप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं.