मुंबई : मुंबईच्या (Mumbai) हवेच्या गुणवतत्ता (Pollution) श्रेणीत मागील 48 तासात घसरण झाल्याची माहिती समोर आलीये. मागील 24 तासांत मुंबईतील मागील 24 तासांत हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाची सरासरी ही 189 वर होती. तसेच गुरुवार 21 डिसेंबर रोजी मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 157 वर पोहचला होता. मागील अनेक दिवसांपासून मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावत चालल्याचं चित्र आहे. परिणामी त्याचा विपरित परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होतोय.
दरम्यान मुंबईसोबतच नवी मुंबईच्या हवेची देखील गुणवत्ता खालावत चालल्याचं पाहायला मिळत आहे. कारण नवी मुंबईतील हवेचा एक्युआय मागील चोवीस तासांत 201 वर जात वाईट श्रेणीत गेलाय. मुंबईसह पुण्याच्या हवेतही बिघाड झाल्याची माहिती समोर आलीये. कारण पुण्याच्या प्रदुषणात देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पुण्याच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 211 वर पोहचला आहे. ओ3 आणि पीएम 2.5 पोल्युटंटचे प्रमाण अधिक असल्याचं समोर आलंय.
मुंबईची हवा बिघडली
वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून त्याचा आरोग्यावर देखील परिणाम दिसू लागलं आहे. राज्य सरकार आणि पालिकेकडून मार्गदर्शक नियमावली काढण्यात आली होती. मात्र, नियमावली धाब्यावर बसवल्या जात असल्याचं चित्र पाहायला मिळालं. अशातच, मुंबईत शेकोटीवर देखील बंदी घालण्यात आली असून पालिकेकडून प्रदूषणासंदर्भात कठोर पाऊलं उचलण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत होतं. तसेच त्यासाठी सुधारित नियमावली जाहीर केली गेली होती.
अशी होती पालिकेची नियमावली
मुंबईत बांधकाम सुरु असलेल्या ठिकणी 15 दिवसांत प्रिंक्लर आणि महिनाभरात स्मॉग गन लावण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले होते. जर या नियमांचं पालन केलं नाही तर जागच्या जागी 'स्टॉप वर्क' नोटीस देण्याचे निर्देश देखील दिले होते. तसेच रस्त्यावर राहणाऱ्या बेघरांना हिवाळ्यात सुविधा देण्याचे प्रयत्न करण्यात येतील. एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान 35 फूट उंचीचे लोखंडी / पत्र्यांचे आच्छादन असावे. त्याशिवाय, संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपडय़ाने झाकलेले असावे.
धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान 4-5 वेळा पाण्याची फवारणी करावी. रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी अॅण्टी स्मॉग मशीन लावाव्या लागतील. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी. सर्व 24 वॉर्डमध्ये सहाय्यक आयुक्तांच्या निर्देशानुसार दोन वॉर्ड अभियंता, एक पोलीस, एक मार्शल आणि एक वाहन अशा स्कॉडच्या माध्यमातून गस्त घालण्यात येईल.
पण हे नियम देऊनही मुंबईच्या हवेत पुन्हा एकदा बिघाड झाला आहे. दरम्यान जर या नियमांचे पालन केले नाही, तर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले होते. त्यामुळे आता पालिका कोणती कठोर पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.