मुंबई : महिलांना मासिक पाळीमध्ये उपयुक्त ठरणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सना जीएसटीमधून वगळण्यात यावं, या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यात येत आहे. विचारधारा ग्रामीण विकास संस्थेतर्फे छाया काकडे यांनी हे आमरण उपोषण सुरु केलं आहे.


सॅनिटरी नॅपकिनसंदर्भातील प्रमुख पाच मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार छाया काकडे यांनी व्यक्त केला आहे.

ग्रामीण भागात मुली आणि महिलांना सॅनिटरी नॅपकिन वापरण्यासाठी जनजागृती करावी लागते, अशात जर नॅपकिनवर कर लावला तर महिलांसाठी समस्या ठरेल, असं त्या म्हणाल्या.

माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयात सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवण्याची मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय रेशनिंग दुकानावर नॅपकिन मिळावे अशा काही मागण्याही छाया काकडे यांनी केल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करण्याची तयारी छाया काकडे यांनी दाखवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पण महिला म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देण्याची मागणी छाया ताई यांनी केली आहे