डोंबिवली : ओएलएक्सवरुन कारमालकांना हेरुन त्यांची फसवणूक करत कार चोरणाऱ्या ठगाला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मयूर तांबोळी असं त्याचं नाव असून त्याच्याकडून चोरलेल्या चार कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत.


‘ओएलएक्स’ या वेबसाईटवर अनेक कारमालक आपल्या कार विकण्यासाठी माहिती टाकतात. अशा कारमालकांना हेरुन मयूर त्यांना त्यांची कार न विकण्याचा सल्ला द्यायचा. तसंच कार फिल्मसिटी किंवा एखाद्या मोठ्या कंपनीत भाड्याने लावण्याचं आमिष दाखवून करारनामा करत कार आपल्या ताब्यात घ्यायचा.

एका कारमालकाला फसवून आरोपीने कार घेतली. मात्र महिना उलटूनही मयूरनं भाडं न दिल्यानं कारमालकाने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली आणि नंतर फोनच बंद करुन ठेवला.

या सर्व प्रकाराचा कारमालकाला संशय आल्याने पोलिसांकडे तक्रार केली. मानपाडा पोलिसांनी मयूरला शोधत त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्या ताब्यातून अशाचप्रकारे चोरलेल्या चार कारही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.