मुंबई : मध्य रेल्वेने सीएसएमटी ते कल्याणदरम्यान एसी लोकल रेल्वेला हिरवा कंदील दाखविण्यात आल्यानंतर. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना पुन्हा एकदा एसी लोकलने प्रवास करता येणार आहे. आजपासून या मध्य रेल्वेवर सोमवार ते शनिवार रोज या एसी लोकलच्या दिवसाला 10 फेऱ्या असणार आहेत. सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर ही लोकल धावणार आहे.


सोमवार ते शनिवार सकाळी 5.42 ते रात्री 11.25 या वेळेत एसी लोकल धावणार आहे. यात दोन सीएसएमटी ते कल्याण, चार सीएसएमटी ते डोंबिवली आणि चार सीएसएमटी ते कुर्ला अशा फेऱ्या असणार आहेत. पहिली लोकल सकाळी 5.42 ला कुर्ल्यावरून सीएसएमटीसाठी सुटेल,  तर शेवटची लोकल रात्री 11.25 ला वाजता सीएसएमटीवरून कुर्ल्यासाठी सुटेल.


म्हणून एसी लोकलचे दरवाजे उघडलेच नाहीत...


जानेवारी, 2020 मध्ये ठाणे ते पनवेल एसी लोकलसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने मध्य रेल्वेच्या मार्गावर ही सेवा सुरू करण्यात आली नव्हती. त्यानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्यापासून मुंबई लोकल बंद ठेवण्यात आली होती. त्यासोबत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सुरू असलेली एसी लोकल देखील तेव्हापासून कारशेडमध्ये प्रतीक्षेत उभी होती. आता मात्र या एसी लोकलला कारशेड मधून बाहेर काढून प्रवाशांसाठी चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेने घेतला आहे.



प्रवाशांचा प्रतिसाद बघून येणाऱ्या काळात या फेऱ्या वाढवल्या जातील. सुरुवातीला जरी या लोकलला अल्प प्रतिसाद मिळाला तरी जेव्हा सामान्य नागरिकांना देखील या लोकल मध्ये प्रवासाची मुभा मिळेल तेव्हा या लोकलला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. सध्या तरी मध्य रेल्वेच्या प्रवाश्यांनी या लोकलचे स्वागत केले आहे.



कोरोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान जुलै महिन्यापासून शासनाने मान्यता दिलेल्या प्रवाशांनाच लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. पण आता सरसकट महिलावर्गाला ठाराविक वेळेत लोकलने प्रवास करता येतो.