मुंबई : नोकरीसाठी दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणीसोबत प्लेसमेंट एजन्सीमधील लोकांनी गैरवर्तन केलं. तसंच तिला आणि तिच्या आईला बेदम मारहाणही केली. या घटनेत जखमी झालेल्या मायलेकींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.


 

सायली धुर्वे असं या पीडित तरुणीचं नाव आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी एक्सपर्ट प्लेसमेंट एजन्सीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

 

काय आहे प्रकरण?

प्लेसमेंट एजन्सीचा मालक आणि कर्माचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. मुलीचे वडील शिवाजी धुर्वे यांच्या माहितीनुसार, "सायलीने अंधेरीच्या एका प्लेसमेंट एजन्सी एक्सपर्ट मॅनेजमेंटमध्ये नोकरीसाठी अर्ज दिला आहे. एजन्सीने यासाठी तरुणीकडून 650 रुपये घेतले होते. पण आठ दिवसांनंतही सायलीला कोणत्याही कंपनीतून कॉल न आल्याने तिने प्लेसमेंट एजन्सीमध्ये फोन करुन विचारणा केली. यानंतर प्लेसमेंट एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी सायलीला ऑफिसमध्ये बोलावलं. तुला ट्रेनिंग द्यावी लागेल, असं सांगत एजन्सीने आणखी पैशांनी मागणी केली."



"परंतु सायलीने पैसे देण्यास नकार दिला आणि आधी भरलेले पैसे परत देण्याची मागणी केली. यानंतर सायली आणि प्लेसमेंट एजन्सीच्या कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. एजन्सीचा मालक आणि एका कर्मचाऱ्याने सायलीसोबत गैरवर्तन केलं. तसंच तिला आणि तिच्या आईला मारहाण केली. दोघींना धक्के मारुन ऑफिसबाहेर काढलं. यादरम्यान सायलीच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली. सायलीला उपचारांसाठी आधी नानावटी रुग्णालय आणि नंतर जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं."

 

घटनेचा पोलिस तपास सुरु  

या घटनेनंतर डी एन नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी सायली आणि तिच्या आईचा जबाब नोंदवला. त्यानंतर एक्सपर्ट मॅनेजमेंट नावाच्या या प्लेसमेंट एजन्सीच्या मालक तसंच कर्मचाऱ्याविरोधात भारतीय दंडविधान कलम 354, 337, 341, 509, 323/34  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.