मुंबई : शहरातील एक रिक्षा चालवणारे आजोबा सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. जे आपल्या नातीच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस एक करताय. आपल्या नातीला स्वतः च्या पायावर उभा करण्यासाठी तिला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी या आजोबांची धडपड सुरू आहे. तर दुसरीकडे आपलं घर चालावं यासाठी वय विसरून हे आजोबा कष्ट करताय. हे आजोबा नेमके कोण आहेत? कुठे राहतात? याबाबत एबीपी माझाने या आजोबांना शोधून काढलं.


74 वर्षांचे देसराज जोद सिंग हे मूळ हिमाचल प्रदेशचे आहेत. जे मागील 35 वर्षांपासून मुंबईत रिक्षा चालवण्याचं काम करत आहेत. काम करत असताना त्यांनी एक स्वप्न पाहिलंय. आपल्या दहावीत शिकत असलेल्या दिया नावाच्या नातीला शिकवून तिला तिच्या स्वतःच्या पायावर उभं करायचं. यासाठी या आजोबांनी रात्रंदिवस रिक्षा चालवत रिक्षालाच आपलं घर केलंय. नातीच्या शिकवण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी हे आजोबा या वयात 'अभी तू में जवान हू'म्हणत न थकता मेहनत करताय.


या देसराज आजोबांना तीन मूलं होती. त्यातील एक मुलगा सहा वर्षांपूर्वी वारला. तर दुसरा मुलाने तीन वर्षांपूर्वी आत्महत्या करून आयुष्य संपवलं. तर तिसऱ्या मुलाने आजोबाशी आणि कुटुंबाशी कायमचे संबंध सोडून दिलेत. त्यामुळे अशा परिस्थितीत आजोबांनी आपल्या सोबत पत्नी, नातू आणि सूना अशा हिमाचल प्रदेशात आपल्या गावी असलेल्या 8 जणांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागलीये. मात्र, या वयात सुद्धा हार न मानता ही जबाबदारी आपल्या चिकाटी आणि कठोर मेहनतीने पेलत आपल्या नातीला, नातवाला सुद्धा चांगलं शिक्षण मिळावं व मोठं करावं हे स्वप्न बघत हे आजोबा रोज झटताय. त्यांच्या या कष्टाचं कौतुक सर्वत्र होतंय. आजोबांना काही प्रमाणात मदतीचे हात सुद्धा येतायेत असं त्यांनी 'एबीपी माझा'ला बोलताना सांगितले.


या आजोबाने आपल्या रिक्षालाच घर केल्यामुळे. सकाळी 6 वाजता रिक्षा सुरू करून रात्री उशिरापर्यंत काम करातात. अगदी लॉकडाऊनमध्ये नर्सेसला सोडविण्याचा काम करत पै ना पै हे आजोबा शिक्षणासाठी आणि घर चालवण्यासाठी जमवत होते. 12- 15 हजार महिन्याला कमावून जेवढे देता येतील तेवढा पैसा घरी आजोबा घरी पाठवतात. आता फक्त नातीला शिक्षिका करून आराम करायचा आणि तोपर्यंत शांत न बसता मेहनत करत राहायची हेच या आजोबांचं ध्येय आणि अखेरचं स्वप्न असल्याचं त्यांनी सांगितलं. सोबतच स्वप्न पाहत राहा, मुलींना शिकवत राहा हा संदेश सुद्धा त्यांनी समाजाला दिला आहे.