बोरीवलीजवळ रेल्वे ट्रॅक ओलांडताना चार भावांना ट्रेनने उडवलं
एबीपी माझा वेब टीम | 14 May 2018 03:07 PM (IST)
दरम्यान, नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
प्रातिनिधीक फोटो
मुंबई : रेल्वे रुळ ओलांडताना बोरीवली आणि कांदिवली स्टेशनदरम्यान चार जणांचा मृत्यू झाला. आज सकाळी पोईसरजवळ ही घटना घडली. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ असून दोघे त्यांचे चुलत भाऊ आहेत. संपत चव्हाण (वय 24 वर्ष), मनोज दीपक चव्हाण (वय 18 वर्ष), साईप्रसाद मनोहर चव्हाण (वय 18 वर्ष), दत्तप्रसाद मनोहर चव्हाण (वय 19 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. बोरीवली स्टेशनच्या आधी रेल्वेला सिग्नल लागल्यावर हे चौघेही पोईसरजवळ खाली उतरले. मात्र यावेळी समोरच्या ट्रॅकवरुन येणाऱ्या ट्रेनने त्यांना उडवलं. यात चौघांचा जागीच मृत्यू झालाय दरम्यान, नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. सीसीटीव्ही फूटेज दाखवत नाही किंवा चौकशी करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाहीत, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. चारही मृतदेह शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे अपघात घडला, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने अपघात नेमका कसा घडला हे समजण्यास अडचणी येत आहेत.