मुंबई : परळच्या उच्चभ्रू परिसरातील 17 मजली क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत चार नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक वृद्ध महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. दोन पुरुषांचा लिफ्टमध्ये अडकल्याने गुदमरुन मृत्यू झाला. तर एका वृद्ध महिला आणि पुरुष यांनी आगीत जीव गमावला. तसंच 16 जणांवर केईएममध्ये उपचार सुरु आहेत.


क्रिस्टल टॉवरला मोठी आग
परेल पूर्वमधील हिंदमाता परिसरातील 17 मजली क्रिस्टल टॉवरच्या बाराव्या मजल्यावर आज सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 गाड्या आणि सहा पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. तसंच इमारतीमध्ये अडकलेल्या 25 जणांना हायड्रोलिक शिडी आणि क्रेनच्या साहाय्याने सुखरुप बाहेर काढलं.

लिफ्टमध्ये गुदमरुन मृत्यू
आग लागल्यानंतर लिफ्टचा वापर करु नये, असं अग्निशमन दलातर्फे वारंवार बजावलं जातं. मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष करत दोघांनी लिफ्टमधून खाली येण्याचा प्रयत्न केला. आग लागल्यानंतर संजीव नायर आणि अशोक संपत हे नागरिकांना वाचवण्यासाठी गेले होते. काही लोकांना त्यांनी वाचवलंही. पण परत येताना त्यांनी लिफ्टचा वापर केला. परंतु त्यांचा लिफ्टमध्येच गुदमरुन करुण अंत झाला.

तर बबलू शेख (वय 36 वर्ष) आणि शुभदा शेळके (वय 62 वर्ष) यांचाही श्वास गुदमरुन मृत्यू झाला.

मुलीच्या प्रसंगावधानाने कुटुंबीयांची सुटका
इमारतीला लागलेल्या आगीनंतर एका मुलीने प्रसंगावधान राखत आगीतून बाहेर पडण्याचं शास्त्रशुद्ध तंत्र दाखवलं आणि आपल्या कुटुंबीयांची सुटका केली. दहा वर्षांच्या झेन सदावर्तेने घरातील कपडे जमवून फाडले आणि ओले केले. ओले कपडे नाकाशी धरुन श्वासोच्छवास करण्याचा सल्ला तिने कुटुंबीय आणि शेजाऱ्यांना दिला. त्यामुळे आगीनंतर धुराचं साम्राज्य पसरलेलं असतानाही श्वास गुदमरत नाही. कपड्यात धुरातील कार्बन शोषला जाऊन ऑक्सिजनचा पुरवठा होत राहतो.

शॉर्ट सर्किटमुळे आग
दरम्यान, आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवलं असून कूलिंग ऑपरेशन सुरु असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. तसंच परिसरातही धूर कायम आहे.

इमारतीला ओसी नव्हती : स्थानिकांचा आरोप
आगीत इमारतीच्या वरच्या मजल्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र पाच वर्षापूर्वी बांधलेल्या या इमारतीला ओसी अर्थात भोगवटा प्रमाणपत्र मिळालं नव्हतं, तसंच बिल्डरने अग्निरोधक यंत्रणाही बसवलेली नाही, असा दावा याच इमारतीत राहणाऱ्या लोकांनी केला आहे.