Mumbai 1993 Bomb Blast : आज 12 मार्च... प्रत्येक मुंबईकराच्या काळजात धडकी भरवणारा दिवस. या दिवसाच्या अंगावर शहारे आणणाऱ्या आठवणी मुंबईकर कधीच विसरु शकणार नाहीत. एक नाही, दोन नाही, तर मुंबईत झालेल्या तब्बल 12 बॉम्बस्फोटांनी अवघ्या देशाला हादरवलं होतं. देशातील हा सर्वात मोठा बॉम्बस्फोट होता. या हल्लात 257 जणांचा मृत्यू झाला होता तर सातशे पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. आज या घटनेला 29 वर्ष पूर्ण झाली आहेत. दहशतवादी टायगर मेमन (Tiger Memon) आणि त्याचा भाऊ याकुब मेमन (Yakub Memon) या दोघांनी हे स्फोट घडवून आणल्याचं समोर आलं होतं. यावेळीच आणखी एक गोष्ट घडली होती, ती फारशी कोणाला माहीत नाही. आणि ती गोष्ट म्हणजे, संवेदनशील परिस्थितीत देशाला सावरण्यासाठी शरद पवारांनी उचललेलं पाऊल.
साल 1993... महिना मार्च... तारीख 12... पण त्यासाठी थोडासा मागचा संदर्भ जाणून घेऊयात. 1992 मध्ये 6 डिसेंबर रोजी बाबरी मशीद पडली. ही घटना घडली उत्तर प्रदेशमध्ये पण त्याचे पडसाद उमटले थेट मुंबईत. संपूर्ण मुंबईत दंगल उसळली होती. डिसेंबर 1992 ते अगदी फेब्रुवारी 1993 पर्यंत मुंबई धगगत होती. मार्च उजाडला आणि सर्व काही स्थिर होणार असं वाटतंच होतं. इतक्यात मुंबईत एका पाठोपाठ एक 12 बॉम्ब स्फोट घडले. 257 जणांनी यात आपला जीव गमावला. तर 1400 लोक जखमी झाले. मुंबई हादरली होती. दहशतवादी टायगर मेमन (Tiger Memon) आणि त्याचा भाऊ याकुब मेमन (Yakub Memon) या दोघांनी स्फोट घडवून आणले आणि ते ही एका व्यक्तीच्या सांगण्यावरून, त्याचं नाव म्हणजे, डॉन दाऊद इब्राहीम कासकर.
मुंबईत नुकतीच दंगल झाली होती आणि त्यातून मुंबई सावरते इतक्यात 12 बॉम्बस्फोटांनी पुन्हा ती हादरली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर होती. अशातच सर्व परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी कोणाला तरी देण्याबाबत दिल्लीत चर्चा सुरु झाल्या. इतक्यात नाव आलं शरद पवारांचं. शरद पवारांना दिल्लीतून मुंबईत पाठवण्यात आलं होतं. त्यांनी हे स्फोट होण्याच्या 6 दिवसांपूर्वीच म्हणजेच, 6 मार्च 1993 रोजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा ताबा घेतला होता. अशातच मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आणण्याची मोठी जबाबदारी तत्कालीन नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर होती.
पाहा व्हिडीओ : Mumbai 1993 Bomb Blast : ...जेव्हा 1993 च्या बॉम्ब स्फोटाबाबत Sharad Pawar खोटं बोलले!
बॉम्ब स्फोट घडले आणि ते कुणी घडवले हा अंदाजा सर्वांनाच आला होता. ही हालचाल धार्मिक आणि बदल्याच्या भावनेतून झाली होती आणि या स्फोटांचं कुठेतरी पाकिस्तान कनेक्शन नक्कीच होतं, हे सर्वांसमोर होतं. Fisherman's Colony in Mahim causeway, Zaveri Bazaar Fort, Plaza Cinema Dadar, Century Bazaar, Katha Bazaar, Hotel Sea Rock, Chhatrapati Shivaji International Airport , Air India Building, Hotel Juhu Centaur, Worli, Bombay Stock Exchange, Passport Office अशी या बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणांची नाव होती आणि यात यादीत कुठेही मुस्लीमबहुल भाग नव्हता. त्यामुळे हे स्फोट हिंदूंना संपवण्यासाठी झाले का? असा सूर येण्याची शक्यता होती. पवारांनी नेमकं तेच ओळखलं. आधीच परिस्थिती गंभीर, त्यात महिन्याभरापूर्वीच मुंबई धार्मिकवादातून पेटलेली दंगल. त्यामुळे पुन्हा एकदा वाद उफाळण्याची शक्यता होतीच.
शरद पवारांनी साखळी बॉम्बस्फोटाची सर्व माहिती घेतली आणि ते थेट दूरदर्शनच्या ऑफिसात पोहोचले. ते मुंबईसोबतच अवघा देश हादरवणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटाबाबत ते जनतेशी संवाद साधणार होते. मुंबईत 12 ठिकाणी स्फोट झालेले असतानाही जनतेला माहिती देताना मात्र शरद पवारांनी 13 ठिकाणी स्फोट झाल्याचं सांगितलं. आणि बॉम्ब स्फोट झालेल्या ठिकाणांच्या यादीत आणखी एक नाव वाढवलं. त्या भागाचं नाव होत, मस्जिद बंदर. मुंबईतील एक मुस्लीमबहुल भाग.
आता प्रश्न असा आहे की, शरद पवारांनी असं का केलं? तर मी आधी म्हटल्याप्रमाणे, काही महिन्यांपूर्वीच हिंदू-मुस्लीम दंगल उसळली होती आणि कुठेतरी ते प्रकरण ताजं होतं. त्यामुळे या बॉम्ब स्फोटांमध्ये कोणत्या ठराविक धर्माच्या लोकांना टार्गेट केलं नाहीये, असं त्यांना भासवून द्यायचं होतं. आणि प्रसंगावधान राखत त्यांनी हे पाऊल उचललं. नाहीतर कदाचित अजून एक दंगल मुंबईनं पहिली असती. ती दंगल रोखण्यासाठी म्हणून पवारांनी ही शक्कल लढवली आणि सर्व काही सांभाळून घेतलं.
शरद पवारांनी हा किस्सा अनेक वर्षांनी त्यांची राजकीय आत्मकथा 'लोक माझे सांगाती' या त्यांच्या पुस्तकातून सांगितला. एवढंच नाहीतर त्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमध्ये देखील सांगितला आहे.
एकंदरीत काय... तर जबाबदार मुख्यमंत्री कसा असतो? हे शरद पवारांनी दाखवून दिलं. आणि जबाबदारी ही कागदोपत्री नसते तर विचारात असते इतकं मात्र नक्की.
महत्त्वाच्या इतर बातम्या :