मुंबई : मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 14 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण?

हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने, तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे.

आगीत जखमी झालेल्या सहा जणांवर परेलच्या केईएम रुग्णालयात तर दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि पोलिस उपायुक्त देवेन भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणावर परिणाम
आगीनंतर या परिसरात असलेल्या ईटी नाऊ, मिरर नाऊ, झूम आणि टीव्ही9 मराठी या वृत्तवाहिनींच्या प्रसारणांवरही परिणाम झाला आहे. काही कार्यालयं आज बंद ठेवण्यात आली आहेत.

मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
हॉटेल 1 Above चे मालक हितेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व सिग्रीड हॉस्पिटॅलिटी अॅण्ड एन्टरटेन्मेंट एलएलपी कंपनीचे मालक आहेत. ONE ABOVE आणि मोजोज बिस्त्रो पब तेच चालवत असल्याची माहिती मिळत आहे. तसंच आगीची सुरुवात वन अबाव्ह रेस्टोबारमधून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
दरम्यान, ही दुर्दैवी घटना असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमला मिल्स कम्पाऊंडमधील आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

"कमला मिल्स कम्पाऊंडमधील दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचं मी सांत्वन करतो आणि तर जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत," असं ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.


तर या आगीनंतर मुंबई महापालिकाही कामाला लागली आहे. महापालिका आता कमला मिल्स कम्पाऊंडमधील सर्व रेस्टॉरन्टची तपासणी करणार आहे.

मृतांची नावं :
प्रमिला
तेजल गांधी (वय वर्षे 36)
खुशबू मेहता (वय वर्षे 28)
विश्वा ललानी (वय वर्षे 23)
पारुल लकडावाला (वय वर्षे 49)
धैर्य ललानी (वय वर्षे 26)
किंजल शहा (वय वर्षे 21)
कविता धरानी (वय वर्षे 36)
शेफाली जोशी
यशा ठक्कर (वय वर्षे 22)
सरबजीत परेला
प्राची खेतानी (वय वर्षे 30)
मनिषा शहा (वय वर्षे 47)
प्रीती राजगीरा (वय वर्षे 41)

आग विझली, राजकारण पेटलं!
मुंबईतल्या कम्पाऊंड मिल्स परिसरातील अग्नितांडवानंतर आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. कम्पाऊंड मिल्सच्या कमी जागेत 50 हॉटेल्सना परवानगी कशी दिली असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. तर या हॉटेल्सना मुंबई महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांना परवानगी दिली, त्यांची चौकशी करा अशी मागणी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे. दुसरीकडे अग्नितांडावाच्या घटनेनंतर भाजप आणि काँग्रेसने शिवसेनेला घेरण्याची तयारी केली आहे.

कमला मिल्स कम्पाऊंड काय आहे?


कमला मिल्स कम्पाऊंड दक्षिण मुंबईतील अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे. अनेक वृत्त वाहिन्या, रेडिओची कार्यालयं या कम्पाऊंडमध्ये आहेत. अत्यंत अलिशान अशी 42 रेस्टॉरंट आणि पबही इथे आहेत. त्यामुळे संध्याकाळनंतर उच्चभ्रू वस्तीतील तरुण-तरुणींची गर्दी या भागात मोठी असते. पब असल्याने तरुणांची रात्री उशिरापर्यंत इथे वर्दळ असते. त्याचसोबत, काही सरकारी कार्यलयं आणि बॅंकाही या कम्पाऊंडमध्ये आहेत.

होरपळून नव्हे गुदमरुन मृत्यू : डॉक्टर
कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेल 1 Above च्या आगीतील 14 जणांचा मृत्यू होरपळून नव्हे तर गुदमरुन झाला, अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे डॉक्टर राजेश डेरे यांनी दिली आहे.



पाहा व्हिडीओ