मुंबई : मुंबईत 13 वर्षांची विद्यार्थिनी 27 आठवड्यांची गरोदर असल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पीडितेच्या वडिलांच्या फास्ट फूड स्टॉलवर काम करणाऱ्या 24 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 'मि़ड डे' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

पीडिता आणि आरोपी कांदिवलीत एकाच परिसरात राहतात. आरोपी पीडितेच्या वडिलांच्या फास्ट फूड स्टॉलवर मदतनीस आहे. आरोपी काही वेळा पीडितेच्या घरी जेवायला जायचा, तर काही वेळा त्यांच्याच घरी राहायचा. भविष्यात लग्न करण्याच्या आमिषाने 24 वर्षीय आरोपीने 13 वर्षीय विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे.

पीडितेच्या पालकांच्यात तक्रारीनंतर चारकोप पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला गुरुवारी अटक केल्यानंतर शुक्रवारी दिंडोशी कोर्टात हजर करण्यात आलं. त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

13 वर्षीय मुलगी 27 आठवड्यांची प्रेग्नंट, गर्भपातासाठी सुप्रीम कोर्टात


मुलीचं वजन दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पीडितेचे आई-बाबा तिला चेकअपसाठी दवाखान्यात घेऊन गेले, मात्र त्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या निदानामुळे पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. संबंधित मुलगी साडेसहा महिन्यांची गर्भवती असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

पालकांनी मुलीला तपासणीसाठी दवाखान्यात नेलं. थायरॉईडमुळे लेकीचं वजन वाढत असल्याचं संशय पालकांना होता. डॉक्टरांनी त्यांना मुलीची सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफी रिपोर्टमध्ये मुलगी 27 आठवड्यांची प्रेग्नंट असल्याचं समजलं.

पीडित मुलगी ही 27 आठवडयांची प्रेग्नंट असल्यानं गर्भपात केल्यास तिच्या जीवाला धोका निर्माण होईल, असं डॉक्टरांनी सांगितलं. मुलीच्या गर्भपातासाठी तिचे पालक डॉक्टरांच्या मदतीने सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहेत. अल्पवयीन मुलीच्या गर्भपातासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असेल.