मुंबईतील रस्ते घोटाळ्यात मोठी कारवाई, 10 लेखा परीक्षकांना अटक
एबीपी माझा वेब टीम | 16 Jun 2016 02:07 AM (IST)
मुंबई : मुंबईतील रस्ते घोटाळा प्रकरणात अटकेची पहिलीच मोठी कारवाई करण्यात आली आहे. या रस्ते घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्या दहा लेखा परीक्षकांना अटक करण्यात आली आहे. आझाद मैदान पोलिसांनी रात्री उशिरा ही कारवाई केली आहे. कंत्राटदारांनी दिलेली बिलं न पडताळता महापालिकेला सादर केल्याचा आरोप लेखा परिक्षकांवर आहे. या अटकेनंतर महापालिका प्रशासनात खळबळ उडाली असून कंत्राटदारांचे धाबे दणालले आहेत. आता यापुढची कारवाई पालिकेचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांवर होण्याची शक्यता आहे. मुंबईतील रस्ते बांधणीत 352 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली. या समितीने मुंबईतील 34 रस्त्यांची पाहणी केली होती. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, काम अपूर्ण ठेवणे यांसह अनेक गंभीर बाबींचा उल्लेख या समितीने आपल्या अहवालात केला आहे.