मल्टिप्लेक्स चालक राज ठाकरेंच्या भेटीला 'कृष्णकुंज'वर
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 07 Jul 2018 02:25 PM (IST)
खाद्यपदार्थांच्या वाढत्या दरांप्रश्नी हायकोर्टातून कोणताही दिलासा न मिळल्यामुळे मल्टिप्लेक्स चालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
मुंबई : मनसेने राज्यभरातील मल्टिप्लेक्स विरोधात सुरु केलेलं आंदोलन यशस्वी झाल्याचं चित्र आहे. या आंदोलनासंदर्भात हायकोर्टातून कोणताही दिलासा न मिळल्यामुळे अखेरीस या मल्टिप्लेक्स चालकांनी शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यभरातील मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये सुरु असलेल्या अवाजवी दरांतील खाद्यपदार्थ विक्रीला विरोध करत 'खळ्ळखटॅक स्टाईल'मध्ये आंदोलन सुरु केलं होतं. या आंदोलनाचा परिणाम म्हणून येत्या काही दिवसांत सर्वसामान्यांच्या पसंतीच्या काही खाद्यपदार्थांचे दर किमान 50/- रुपयांवर आणू, असं आश्वासन थिएटर चालकांकडून राज ठाकरे यांना देण्यात आलं. यात पाण्याची बाटली, समोसा, पॉपकॉर्न, वडापाव अशा सर्वसामान्यांच्या पसंतीच्या पदार्थांचा समावेश असेल.