ठाणे : मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाची संततधार सुरुच आहे. ठाणे आणि रायगड परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. मध्य रेल्वेची कर्जत आणि कल्याण दरम्यानची रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. कर्जत आणि विठ्ठलवाडीजवळ रेल्वे रुळावर पाणी साचल्याने काही काळ कर्जतकडून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली होती.
कर्जत रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून रुळ पाण्याखाली गेले. चौक स्थानकातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत होती. रुळावर पाणी साचल्याने प्रगती एक्स्प्रेस आणि नांदेड-पनवेल एक्स्प्रेस कल्याणमार्गे वळवण्यात आल्या. पुणे-भुसावळ एक्स्प्रेस ही दौंडमार्गे वळवण्यात आली आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याने कामानिमित्त मुंबईकडे येणाऱ्या नागरिकांची कोंडी झाली. कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांनाही मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. वीकेंड असल्याने पिकनिकसाठी बाहेर पडणाऱ्यांनाही आपल्या निश्चित स्थळी पोहचणे कठीण झाले आहे.
मुसळधार पावसामुळे मुरबाड तालुक्यातील उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. मुरबाड-कल्याण रस्त्यावर पाणी साचलं आहे. त्यामुळे मुरबाड ते कल्याण रस्तादेखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.