मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा देशभरात लागू झाल्यानंतर सोशल मीडियातही त्याचे पडसाद पाहायला मिळत आहे. ट्विटरवरही अशीच एक गोष्टी सध्या पाहायला मिळत आहे. हा कायदा देशात लागू झाल्यानंतर काही ट्विटर युजर्सनी मुस्लीम असल्याचा दावा करत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे समर्थन केले आहे. सोबतच देशातील मुस्लीम बांधवांनीही याचे समर्थन करावे, असं आवाहनही यातून करण्यात आलं आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा देशभरात लागू झाल्यानंतर याचे पडसाद विविध स्तरातून पाहायला मिळत आहे. या कायद्याला ईशान्य भारतातून प्रचंड विरोध होत असून आसामसह अनेक राज्यात आगडोंब उसळला आहे. ही आग आता राजधानी दिल्लीत पोहोचली आहे. दिल्लीतील काही विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान तीन बस जाळल्याची घटना घडली आहे. अशातच आता ट्विटरवरुन मुस्लीम युवकांकडून या कायद्याचे समर्थन करत असल्याचे संदेश फिरत आहे.

काय आहे ट्विट?
मुस्लीम असल्याचा दावा करणाऱ्या या ट्विटर युजर्सनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला(कॅब)जाहीर पाठिंबा दर्शवत देशातील मुस्लीम बांधवांना आवाहन केले आहे. "मी एक मुस्लीम असून नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचे समर्थन करतो. या विधेयका विरोधात माझ्या मुस्लीम बांधवांकडून सुरु असलेल्या आंदोलनाचा मी तीव्रपणे निषेध करतो. त्यांना एकतर हे बिल समजलं नाही, त्यांची दिशाभूल करण्यात आली आहे किंवा ते जाणूनबुजून सरकारला लक्ष्य करत आहेत. पण, मला याचा अभिमान आहे. जय हिंद", असा मजकूर एकाच वेळी अनेकांनी पोस्ट केला आहे.


विधेयक मंजूर झाल्यानंतर ट्विटरवरुन समर्थन -
11 डिसेंबर 2019 ला हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर 12 डिसेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यावर स्वाक्षरी केली. त्यानंतर ट्विटरवरुन या विधेयकाच्या समर्थनार्थ संदेश फिरु लागले आहेत. नागरिकत्व संशोधन विधेयकात बांग्लादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तानातील सहा अल्पसंख्य समुदायांना भारताचं नागरिकत्व देण्याचा हा प्रस्ताव आहे. सहा समुदायांमध्ये हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ईसाई आणि शीखांचाही समावेश आहे. दरम्यान, मुस्लीम असल्याचा दावा करणाऱ्या ट्विटर्स युजर्सचे अकाउंट चेक केले असता यापूर्वी हिंदू असल्याचे ट्विट त्यांच्याकडून करण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सर्व ट्विटर्सवरुन एकाच प्रकारचा मजकूर पोस्ट करण्यात आला असल्याचे पाहायला मिळाले आहे.