मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन आता देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. राज्यासह देशातल्या अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनीदेखील यात उडी घेतली आहे. रणजित सावरकरांनी राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर देत राहुल गांधींसह संपूर्ण नेहरु-गांधी परिवाराला लक्ष्य केले आहे.
रणजित सावरकर म्हणाले की, महापुरुषांचा अपमान हा नेहरु-गांधी परिवाराच्या डीएनएमध्येच आहे. राहुल गांधी यांचे पणजोबा पंडित नेहरु यांनीदेखील महापुरुषांचा अपमान केला आहे. मुस्लीम मतं मिळवण्यासाठी पंडित नेहरु छत्रपती शिवाजी महाराजांना लुटेरे म्हणाले होते. काल त्यांचे पणतू राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला.
सावरकर यांनी सत्ताधारी शिवसेनेला आणि विरोधी पक्ष भाजपला आवाहन केलं आहे की, शिवसेना-राष्ट्रवादीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या कांग्रेसची महाविकास आघाडीमधून आणि राज्याच्या सत्तेमधून हकालपट्टी करावी आणि भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचं अल्पमतातील सरकार वाचवावं. अशा परिस्थितीत शिवसेनेचं सरकार वाचवणं, ही भाजपची नैतिक जबाबदारी असेल.
रणजित सावरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवाहन केले आहे की, त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना अटक करण्याचे आदेश द्यावेत.
दरम्यान, राहुल गांधींच्या वक्तव्याचे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तसे संकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सावरकरांबद्दल जाज्वल्य अभिमान बाळगणाऱ्या शिवसेनेला आज कसली सौदेबाजी करावी लागतेय, असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे. त्यावर शिवसेनेला सावरकरांबद्दल अभिमान असल्याचे शिवसेनेचे नेते आणि गृहमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. तर काँग्रेस नेते राजीव सातव यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे सावरकरांच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेस आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.