मुंबई : महाराष्ट्रातील सरकारबाबत या आठवड्यात आम्हाला हवं असणारं नवं काहीतरी घडेल, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. सोबतच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सावरकरांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे राहुल गांधींनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं आणि माफी मागावी अशी मागणी  रामदास आठवले यांनी केली आहे. आठवले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी कॉंग्रेसला सल्ला देत ते म्हणाले की, शिवसेनेसोबत इतके टोकाचे मतभेद असतील तर त्यांनी शिवसेनेचा पाठिंबा काढून घ्यावा. तसेच शिवसेनेला देखील राहुल गांधींच्या वक्तव्याची आठवण करून देतं त्यांनी सरकारमधून बाहेर पडत भाजपसोबत सरकार बनवावं, असा सल्ला देखील दिला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सेनेने सरकार बनवलं आहे परंतु अद्याप त्यांना मंत्रिमंडळ बनवता न आल्याची टीका देखील त्यांनी केली.


आठवले म्हणाले की, राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली. याला शिवसेनेने देखील विरोध केला आहे. ते नाराज आहेत. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही असं मला वाटतं. मला वाटतं भाजपने मी दिलेला तीन- दोन वर्षांचा फॉर्म्युला मान्य करावा. जर त्यांनी तो मान्य केला असता तर राज्यात आत्ता आमचं सरकार असतं. सध्याच्या वातावरणावरुन असं वाटतंय की या आठवड्यात काहीतरी नक्की घडेल, असे आठवले म्हणाले. आम्हाला हवं असणारं या आठवड्यात घडेल, अशी माझी माहिती आहे. माझी माहिती अशी आहे की, मी दिलेल्या फॉर्म्युल्याचा विचार सुरू आहे, असेही आठवले म्हणाले.

शिवसेना आणि काँग्रेसची विचारधारा परस्पर विरोधी आहे. या पक्षांची युती अनैसर्गिक आहे. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करीत असताना शिवसेनेने मलूल भूमिका घेऊ नये. शिवसेना वाघाचा बच्चा आहे हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे, असे आठवले म्हणाले. शिवसेनेने काँग्रेसला धडा शिकविला पाहिजे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाघासारखी आहे. राहुल गांधींना इशारा देणारी डरकाळी शिवसेने आता फोडली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावे. शिवसेनेने काँग्रेस सोबतचे सरकार बरखास्त केल्यास भाजप सोबत पुन्हा महाराष्ट्रात सरकार स्थापन करावे. शिवसेना भाजप महायुतीचे सरकारच स्थिर टिकाऊ सरकार ठरेल, असेही आठवले म्हणाले.