मुंबई:  टॅक्सी चालकांची मुजोरी, अरेरावी मुंबईकरांना काही नवी नाही.  मात्र, आज चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाच टॅक्सी चालकाच्या मुजोरीचा अनुभव आला. दादर स्टेशन परिसरात आलेल्या या अनुभवाबद्दल त्यांनी ट्विट करून माहिती दिलीये. औरंगाबादहून मुंबईत दादरला रेल्वे स्थानकावर उतरताना सुप्रिया सुळेंसोबत हा प्रकार घडला.

सुप्रिया सुळे या ट्विटमध्ये म्हणतात की, दादर स्टेशनवर आज एक विचित्र अनुभव आला. कुलजित सिंग मल्होत्रा नावाचा एक माणूस ट्रेनमध्ये येऊन टॅक्सी घेण्यासाठी विचारू लागला. मात्र, त्याला दोनदा नकार देऊनही त्यानंं माझी वाट अडवली, मला त्रास दिला आणि निर्लज्जपणे फोटोही घेऊ लागला.



सुळे यांनी हा सगळा प्रकार आपल्या पुढच्या ट्विटमध्ये रेल्वे मंत्रालयाच्या निदर्शनास आणलाय. घडल्या प्रकारात रेल्वे मंत्रालयानं लक्ष घालावं जेणेकरून प्रवाशांना अशा अनुभवांचा सामना करावा लागणार नाही. टॅक्सीचालकांना टॅक्सीसेवेसाठी प्रवाशांना विचारणं कायदेशीर असेल, मात्र रेल्वे स्थानकं, विमानतळ इथं अशी परवानगी न देता फक्त ठराविक टॅक्सी तळांवरच देण्यात यावी. असं या ट्विटमध्ये सुळे यांनी म्हटलंय. याशिवाय, सुळे यांनी रेल्वे पोलिसांत लिखित तक्रारही दाखल केली. "अशा प्रकारे प्रवाशांना टॅक्सी घेण्यासाठी त्रास देणं, त्यांच्या मागे लागणं ही छळवणूक आहे. महिलेच्या जवळ जाऊन असं वागणं चुकीचं आहे", असंही सुप्रिया सुळे 'एबीपी  माझा'शी फोनवर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या.

सुप्रिया सुळेंच्या या संतापाची दखल घेत रेल सुरक्षा दलाच्या पोलिसांकडून संबंधित टॅक्सी चालकावर कारवाई करण्यात आली. दरम्यान,  जवळचं भाडं, वेगळ्या रूटचं भाडं न घेण्याचा किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडल्यास टॅक्सी चालकांच्या छळवणुकीचा सामान्यांना येणारा अनुभव खासदारांनाही आल्यानं ही प्रवृत्ती किती फोफावली आहे तेही दिसून येत आहे.