मुंबई : काही दिवसांपूर्वी एका माथेफिरु व्यक्तीनं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर अचानकपणे घुसखोरी केल्याच्या घटनेची दखल हायकोर्टानंही घेतली आहे. विमानतळावर इतकी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना अशी घुसखोरी कशी झालीच कशी?, याचा खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय विमानतळ प्राधिकरणला बुधवारी दिले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणत्या यंत्रणा उपलब्ध आहेत? याबाबत माहिती देण्याचे निर्देश न्यायालयाने यापूर्वीच महासंचालक नागरी उड्डाण आणि हवाई उड्डाण मंत्रालयाला दिलेले आहेत. यासंदर्भातील याचिकेवर पुढील सुनावणी आता ऑक्‍टोबरमध्ये होणार आहे.


मुंबईतील विमानतळांच्या सुरक्षेबाबत अॅड. यशवंत शेणॉय यांनी केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. विमानतळ परिसरात उभ्या राहणाऱ्या उत्तुंग टॉवर, धावपट्टीच्या शेजारील बेकायदेशीर बांधकामामुळे विमानसेवेच्या वाहुतकीला मोठा धोका निर्माण झाला आहे, अशी चिंता या याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे.


बुधवारच्या सुनावणीत अॅड. शेणॉय यांनी माथेफिरु व्यक्तिच्या घुसखोरीच्या थेट धावपट्टीवरील घटनेबाबत हायकोर्टाला माहिती दिली. संबंधित माथेफिरुनं विमान जवळून पाहायचं म्हणून सुरक्षा भेदून थेट विमानतळाच्या धावपट्टीवर प्रवेश केला आणि तो चक्क विमानाच्या खालपर्यंत पोहचला होता, अशी माहिती त्यांनी दिली. न्यायालयानेही याबाबत चौकशी करुन खुलासा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.


यापूर्वीही देशांतर्गत वाहतुक करणारं एक विमान धावपट्टी सोडून खाली उतरलं होतं, तांत्रिक बिघाडामुळे अनेकदा उड्डाणं रखडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. असंही अॅड. शेणॉय यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.