मुंबई : दररोज सीएसएमटीच्या दिशेने हजारो प्रवाशांना सुखरूप घेऊन येणाऱ्या आणि संध्याकाळी पुन्हा आपल्या राहत्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या लोकल ट्रेनचे मोटरमन दिलीप सिंग यांच्या नोकरीचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे ऑफिसला वेळ होत असतानाही अनेक मुंबईकर त्यांच्याजवळ थांबून, त्यांना मिठी मारून, त्यांना शुभेच्छा देत त्यांचा निरोप घेत होते. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील वातावरण आज भाऊक झालं होतं.
फुलांनी सजविलेली लोकल ट्रेन, त्यात काळा कोट आणि डोक्याला रुमाल बांधून त्याच उत्साहात लोकलट्रेन चालवणारे दिलीप सिंग आज सीएसएमटी स्थानकावर पोहोचले आणि लोकलमधून उतरलेल्या प्रवाशांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेत त्यांना हारतुरे घातले तर अनेकांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
आज दिलीप सिंग यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस होता. दिलीप सिंग हे 27 वर्षांपूर्वी आग्रा इथल्या बरहान गावातून नोकरीसाठी मुंबईत आले. त्यावेळी त्यांचे शिक्षण बीएससीपर्यंत झालं आहे. 26 वर्ष ते मुंबईत रेल्वे प्रशासनामध्ये आपली सेवा बजावत आहेत. मोटरमन म्हणून त्यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर लाखो प्रवासी त्यांच्या वेगळ्या लूक आणि स्वभावामुळे त्यांच्याशी जोडले गेले. नेहमी हसतमुख आणि येणाऱ्या-जाणाऱ्या हसर्या चेहर्याकडे बघून हात करणारे दिलीप सिंग हे आज आपल्या ट्रेनचे मोटरमन आहेत समजल्यानंतर अनेक प्रवाशांना बरं वाटायचं. सीएसएमटीला उतरल्यानंतर अनेक वर्ष हे प्रवासी दिलीप सिंग यांच्या हातात हात देऊन पुढे आपल्या कामाला निघून जायचे. नेहमी हसतमुख असणाऱ्या दिलीप सिंग यांनी प्रवाशांच्या मनावर आपली एक वेगळी छाप उमटवली होती. नोकरी करता करता 26 वर्ष कधी उलटली हे त्यांनाही कळलं नाही. काही कारणांमुळे त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. आज त्यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस होता.
सकाळी अकरा वाजता ठाण्याहून निघालेल्या आणि सीएसएमटीच्या दिशेने धावणाऱ्या लोकल ट्रेनला फुलांनी सजवलं होतं. काळा कोट, डोक्याला रुमाल बांधून त्याच उत्साहाने मोटरमन दिलीप सिंग हे लोकल ट्रेन चालवत होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये लोकल ट्रेन दाखल होताच फुलांनी सजविलेल्या लोकलकडे सार्यांचे लक्ष गेलं. लोकल ट्रेनचा हॉर्न वाजू लागला. लोकल ट्रेन थांब्यावर थांबताच अनेक प्रवासी धावत मोटरमन केबिन जवळ आले. दिलीप सिंग यांचे सहकारी, प्रवासी यांनी दिलीप सिंग यांना पुष्पगुच्छ, हारतुरे घालून हस्तांदोलन करून त्यांना आज निरोप दिला. यावेळी अनेक प्रवाशांना मोटरमन दिलीप सिंग यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. हा संपूर्ण प्रकार सीएसएमटीवर असणारे अनेक प्रवासी कुतुहलाने पाहात होते. आणि तेही ही याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते.
अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या करतात. मात्र ते कधी आले, कधी गेले आणि कधी रिटायर झाले याचा पत्ताही नसतो. मात्र दिलीप सिंग यांच्यासारख्या या दिलखुलास, मितभाषी व्यक्तिमत्वाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते.' काळजी घ्या दिलीप सर' असं अनेकजजणांनी सांगत त्यांनी दिलीप सिंग यांना निरोप दिला.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'काळजी घ्या दिलीप सर', लाडक्या मोटरमनला निरोप देताना मुंबईकरांचे डोळे पाणावले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Aug 2019 03:06 PM (IST)
फुलांनी सजविलेली लोकल ट्रेन, त्यात काळा कोट आणि डोक्याला रुमाल बांधून त्याच उत्साहात लोकलट्रेन चालवणारे दिलीप सिंग आज सीएसएमटी स्थानकावर पोहोचले आणि लोकलमधून उतरलेल्या प्रवाशांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेत त्यांना हारतुरे घातले तर अनेकांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -