दिव्यांग व्यक्तीसाठी विश्वजीत कदम थेट विधीमंडळाच्या गेटवर!
एबीपी माझा वेब टीम | 28 Feb 2020 12:39 PM (IST)
राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी एका दिव्यांगाच्या विनंतीला मान देऊन त्याची थेट विधीमंडळाच्या गेटवर जाऊन भेट घेतली.
मुंबई : एका दिव्यांग व्यक्तीसाठी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी थेट विधानमंडळाचे गेट गाठले. शिरीष कुलकर्णी या दिव्यांग व्यक्तीला विश्वजीत कदम यांना भेटायचे होते. मात्र चालता येत नसल्याने आत येऊ शकत नाही, असा निरोप सभागृहात असलेल्या विश्वजीत कदम यांना मिळाला. यानंतर विश्वजीत कदमांनी सभापतींची वेळ मागून विधीमंडळाचं गेट गाठलं. विधीमंडळात काल (27 फेब्रुवारी) मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मराठी भाषा अनिवार्यबाबत चर्चा सुरु होती. यावेळी शिरीष कुलकर्णी हे मुंबईतील एका गृहनिर्माण संस्थेसंदर्भात अर्ज घेऊन आले होते. यासाठी त्यांना विश्वजीत कदम यांना भेटायचं होतं. परंतु चालता येत नसल्यामुळे आत येऊ शकत नाही, असा निरोप विश्वजीत कदमांना मिळाला. शिरीष कुलकर्णी कामासाठी लांबून आल्याने विश्वजीत कदमांनी सभापतींकडे पाच मिनिटांची वेळ मागून विधीमंडळाच्या गेटच्या दिशेने निघाले. कदम यांनी शिरीष कुलकर्णी यांचं म्हणणं गेटवरील खुर्चीतच बसूनच ऐकलं आणि तात्काळ संबंधित अधिकार्यांना आवश्यक कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना केली. गेटवर जाऊन डॉ. विश्वजीत कदम यांनी दिव्यांग व्यक्तींबरोबर केलेली चर्चा इथे तैनात असलेले पोलीस आणि इतर लोक कुतूहलाने बघत होते.