मुबई : मुंबई उपनगरात 200 पेक्षा जास्त इमारती धोकादायक आहेत. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याच घाटकोपर मतदारसंघात 22 ते 23 इमारती धोकादायक असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

पावसाळापूर्व सर्वेक्षणात मुंबईतल्या जुन्या इमारतींची माहिती जाहीर करण्यात आली आहे. मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळातर्फे पावसाळापूर्व सर्वेक्षण करण्यात येतं. यात ही माहिती समोर आली.

मुंबई शहर भागात 100 इमारती धोकादायक आहेत. मुंबईतल्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या सात उपकरप्राप्त इमारती (सेस इमारती) अतिधोकादायक असल्याचं सर्वोक्षणात म्हटलं आहे.

93 इमारती (सि 1) प्रकारात मोडतात, ज्या इमारती ताबडतोब खाली करणं गरजेचं आहे. मुंबई उपनगरांत 200 पेक्षा जास्त इमारती धोकादायक आहेत. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याच मतदारसंघ असलेल्या घाटकोपरमध्ये 22-23 इमारती धोकादायक आहेत.

यावर्षी अतिधोकादायक आढळलेल्या सात उपकरप्राप्त इमारतींपैकी सहा इमारती गेल्यावर्षीही अतिधोकादायक इमारतींच्या यादीत होत्या. या अतिधोकादायक इमारतींमध्ये 214 निवासी आणि 189 अनिवासी असे एकूण 403 रहिवासी/भाडेकरु रहिवासाला आहेत.

सध्या 111 रहिवाशांनी स्वत: इतरत्र राहण्याची व्यवस्था केली आहे. आतापर्यंत केवळ दोन रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्यात आलं आहे. इतर 117 रहिवाशांची अजून कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.