Monsoon News : अखेर मान्सून (Monsoon) मुंबईच्या (Mumbai) वेशीवर दाखल झाला आहे. पुढील 48 तासात मान्सून मुंबई दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं (IMD) दिली आहे. मोसमी वारे अलिबागपर्यंत सक्रिय झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागानं केली आहे. राज्याची उपराजधानी नागपुरातही (Nagpur) मान्सून दाखल झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.
पुढच्या 48 तासात मान्सून मुंबई दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. काल रात्रीपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं हवामान विभाग मुबईत कधी मान्सून दाखल झाल्याची घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण पुढच्या 48 तासात मान्सून मुंबई दाखल होणार असल्याचे हवामान विभागानं सांगितले आहे.
सोबतच मध्य महाराष्ट्रातील काही भागासह मराठवाड्यातील काही भागात मान्सून दाखल झाला आहे.
संपूर्ण पूर्व विदर्भात मोसमी वारे सक्रिय
संपूर्ण पूर्व विदर्भात मोसमी वारे सक्रिय झाल्याची माहिती देखील भारतीय हवामान विभागानं दिली आहे. पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. तसेच तळकोकणात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. सोबतच उद्या रायगड परिसरात देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.
मुंबईच्या विविध भागात जोरदार पाऊस
मुंबईत रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री चांगला पाऊस झालयानंतर सकाळपासूनही मुंबईतील विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अंधेरी, कुर्ला, दादर, वांद्रे, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, लालबाग, परळ, भायखळा, विलेपार्ले या परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच नवी मुंबईसह ठाणे परिसरात देखील पावसानं हजेरी लावली आहे. पूर्व विदर्भात मान्सूनचे आगमन झाले असून आज मान्सून विदर्भ व्यापण्याची शक्यता आहे. 25 जूनपर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात संपूर्ण राज्यात पावसाचं चित्र स्पष्ट होणार आहे. पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. बऱ्याच विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला आहे. पाऊस सुरु झाल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. खोळंबलेल्या पेरण्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: