Mumbai Rain : 29 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याची शक्यता हवामान विभागानं (IMD) वर्तवली आहे. अशातच मुंबईत (Mumbai) रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री चांगला पाऊस झालयानंतर सकाळपासूनही मुंबईतील विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अंधेरी, कुर्ला, दादर, वांद्रे, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, लालबाग, परळ, भायखळा, विलेपार्ले या परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच नवी मुंबईसह ठाणे परिसरात देखील पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई मान्सून दाखल होण्याचे निकष आजच पूर्ण झाल्यास हवामान विभागाकडून मान्सून सक्रिय झाल्याची घोषणा होऊ शकेल. 


Palghar : पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी 


दरम्यान, 26 जून रोजी मान्सून मुंबई दाखल झाल्यास आत्तापर्यंतचा सर्वात उशिरा दाखल होण्याची नोंद होणार आहे. याआधी 2019 साली 25 जून रोजी मान्सून दाखल झाला होता. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात संपूर्ण राज्यात पावसाचं चित्र स्पष्ट होणार आहे. पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. बऱ्याच विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला आहे. पाऊस सुरु झाल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. खोळंबलेल्या पेरण्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. 


पूर्व विदर्भात मान्सूनचे आगमन 


पूर्व विदर्भात मान्सूनचे आगमन झाले असून आज मान्सून विदर्भ व्यापण्याची शक्यता आहे. 25 जूनपर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मात्र पश्चिम विदर्भात आणखी एक ते दोन दिवस मान्सूनची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा मॅान्सूनने व्यापला आहे. पावसामुळं विदर्भाच्या बऱ्याच भागात खरीप पेरणीला गती मिळणार आहे. काल पडलेल्या पावसामुळे नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात कापूस लागलडीला वेग येणार आहे.  पाऊस उशीरा आल्याने लांबलेल्या पेरण्या उरकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु होईल. पुढील 60 तासांत संपूर्ण विदर्भात मान्सून पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 25 ते 28 जून विदर्भाच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं मान्सूनची वाटचाल जोरात सुरु आहे. राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Weather Update : उत्तर भारतात पावसाची हजेरी; मध्य प्रदेशात बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम, आज मुसळधार पावसाचा इशार