मुंबई : श्रीलंकेत मान्सून दाखल झाला असून लवकरच भारतातही दाखल होईल. साधारणपणे श्रीलंकेनंतर पुढच्या 6 दिवसात मान्सून भारतात दाखल होतो. कालच श्रीलंकेत मान्सून दाखल झाल्यामुळे 9 ते 10 तारखेपर्यंत मान्सून भारतात प्रवेश करेल, असा अंदाज 'स्कायमेट' या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे.
श्रीलंकेत मान्सून साधारण 25 मे पर्यंत दाखल होतो. मात्र यावर्षी मान्सून जवळपास आठवडाभर उशिराने दाखल झाला आहे. एकूणच मान्सूनची वाटचाल 8 ते 10 दिवस उशिराने होत आहे. श्रीलंकेनंतर आता काही दिवसात केरळमध्ये मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील 48 तास हलक्या पावसाच्या सरी कोसळतील, असाही अंदाज 'स्कायमेट'ने वर्तवला आहे. मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्या सरी पडतील. मात्र त्यानंतर वातावरण पुन्हा कोरडं होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होते. मात्र पुर्वोत्तर अरबी समुद्रात गुजरात आणि महाराष्ट्र किनारपट्टी परिसरात अनुकूल वातारवरण तयार झालं नाही, त्यामुळे मुंबईत मान्सून पूर्व पावसाने दांडी मारली.