मुंबई : अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल सोमवारी मध्यरात्रीपासून संकेतस्थळावर उपलब्ध झाला. पीसीएममध्ये नांदेडचा आदर्श अभंगे, तर पीसीबीमध्ये सोलापूरचा विनायक गोडबोले 100 पर्सेंटाईल मिळवत अव्वल आले. विद्यार्थ्यांना हा निकाल mhtcet2019.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.

एमएचटी सीईटी परीक्षेत अहमदनगरच्या आविष्कार आंधळे, जळगावच्या कुणाल चौधरी या विद्यार्थ्यांना 99.99% पर्सेंटाईल स्कोअर मिळवला आहे. मुंबईतील किमया शिकारखाने, प्रियांत जैन आणि अमरावतीच्या सिद्धेश अग्रवालनं 99.98 पर्सेंटाईल स्कोअर मिळवला आहे.



राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने राज्यभरातील 36 जिल्ह्याच्या ठिकाणी 166 परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने 10 दिवस 19 सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 लाख 92 हजार 354 विद्यार्थी बसले होते. तर 20 हजार 930 विद्यार्थी परीक्षेस गैरहजर राहिले होते.


पीएसएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) हे विषय घेवून 2 लाख 76 हजार 166 विद्यार्थी बसले होते. तर पीसीबी(फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी) हे विषय घेवून 28 हजार 154 विद्यार्थी बसले आहेत.


निकालावर संबंधित विद्यार्थ्याचे छायाचित्रही असणार आहे.त्याचप्रमाणे संबंधित विद्यार्थ्याने किती वाजता निकाल डाऊनलोड करून घेतला,याबाबतची माहितीही दिली जाईल,असे प्रवेश परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.