मुंबई : कोरोना महामारी काळात महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी आलीय. सर्वजण ज्याची चातकाप्रमाणे वाट पाहात असतात तो मान्सून अखेर राज्यात दाखल झालंय. दोन दिवसांपूर्वीच राज्यात मान्सूनचं आगमन झालं असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता शेतीकामाला वेग येणार आहे. तर दुसरीकडे पावसाळा येत असल्याने कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरु झाली आहे.


राज्यात यंदा वेळेच्या आधी मान्सूनचं आगमन
काही दिवसांपासून केरळात दक्षिण-पश्चिम मान्सून दाखल होण्याची स्थिती निर्माण झाली होती. यंदा मान्सून केरळात सामान्य वेळेपेक्षा उशिरा पोहोचला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, केरळमध्ये वर्दी दिल्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल सुरु होईल. 11 जून रोजी महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, त्याआधीच मान्सून राज्यात दाखल झाल्याची माहिती हवामाने विभागाने दिलीय. केरळमध्ये सामन्यत: 1 जून रोजी मान्सून दाखल होतो. परंतु, यंदा दोन दिवस उशिरा वरुणराजाने हजेरी लावली. याआधी आयएमडीने  यंदा मान्सून केरळमध्ये 31 मे म्हणजेच चार दिवस आधी पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता.


राज्यात मान्सूनपूर्ण पावसाची जोरदार हजेरी
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावासाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या तीन दिवसांपासून नाशिकमध्ये अधून मधून पावसाच्या सरी कोसळत असून आज देखील संध्याकाळी अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. संध्याकाळी नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. जवळपास तासभर झालेल्या पावसाने शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचल्याचही चित्र बघायला मिळत होतं.या मान्सूनपूर्व पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना यामुळे दिलासा मिळालाय तर दुसरीकडे याच पावसामुळे कांद्यासह ईतर पिकांना फटका बसण्याचीही शक्यता वर्तवली जातीय.


कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसानं हजेरी लावलीय. तीन वाजण्याच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि उकाड्यानं हैरान झालेल्या कोल्हापुरांना काहीसा दिलासा मिळाला. काल देखील अशाच पद्धतीनं पावसानं हजेरी लावली होती. आज वीजेच्या कडकडाटासंह वरुण राजा कोसळायला लागलाय. मान्सूनपूर्व पावसामुळं शेतीच्या कामाला आणखी वेग येणार आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पेरणीची कामं अंतिम टप्प्यात आली आहेत. 25 मे पासूनच शेतकऱ्यांनी भात पेरणीला सुरुवात केलीय.


नांदेड जिल्ह्यातही आज सकाळी मान्सूनपूर्व पाऊस मुसळधार झालाय. त्यामुळे नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेली शेतकऱ्यांची हळद आणि इतर शेती मालाचे प्रचंड नुकसान झालय. कृषी उत्पन्न बाजार समितीने रिकामे आणि बांधकाम सुरू असलेले सुरक्षित गाळे उपलब्ध करून दिले नाही. म्हणून हे नुकसान झाले असून या नुकसानीला जबाबदार कोण असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत.