मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एअर इंडिया आणि कॅशलेस व्यवराहारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कान टोचले आहेत. मुंबई शेअर बाजारातील एका व्याख्यानात ते बोलत होते.


‘एअर इंडिया तोट्यात आहे हे खरं... मात्र, ही सेवा दुसऱ्या देशातील कंपनीला देऊ नये. कधीही आपल्या देशावरील आकाश हे दुसऱ्या कोणाकडे देऊ नये. जर्मनी, फ्रान्ससारखे देश काय म्हणतात ते बघा, त्यांनी काय केलं ते बघा. एअर इंडिया कंपनी तोट्यात आहे तर त्याच्या अॅसेटचा विचार का होत नाही? जर एअर इंडिया चालत नसेल तर चालवणारा आणा.’ अशा शब्दात भागवतांनी मोदींचे कान टोचले.

भारतीय अर्थव्यवस्था आणि आर्थिक धोरणांसंदर्भात दीर्घकालीन दृष्टिकोन या विषयावर शेअर बाजारात त्यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं.

दरम्यान, याचवेळी मोहन भागवत यांनी कॅशलेसवरुनही मोदी सरकारला घरचा आहेर दिला.

‘आज योजना येतात ,पण लोकांना लाभ मिळत नाही. आपण कॅशलेस करु शकणार नाही. कारण मोठा समाज या व्यवस्थेबाहेर आहे. तो आता हे शिकण्याच्या मनस्थितीत नाही.’ असंही भागवत म्हणाले.