मुंबई: फॉरेनर असल्याची बतावणी करुन मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा कारनामा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मुलुंडमध्ये ही घटना घडली. आपण परदेशी असून मनी एक्स्चेंज करुन द्या, अशी विनंती या टोळीनं दुकान मालकाला केली. याबाबत चर्चा सुरु असतानाच दुसऱ्या एका महिलेनं टेबलवरचा महागडा मोबाईल उचलून आपल्या बॅगेत टाकला.

काल दुपारी मुलुंड पूर्वच्या फडके रोडवर असलेल्या निल टेलिकॉममध्ये एक महिला आणि दोन सुशिक्षित उच्चभ्रू दिसणाऱ्या व्यक्ती आल्या. त्यांनी दुकानाचे मालक प्रकाश लोहार यांना आपण फॉरेनर असल्याचे सांगत मनी एक्स्चेंज करून देण्याची विनंती केली.

या टोळीतील पुरुष मालकाशी बोलत असताना एक महिला दुकानातील कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवीत राहिली, तर दुसऱ्या महिलेने टेबलवर ठेवलेला महागडा मोबाईल लंपास केला. काही वेळाने हे तिघेही निघून गेले. परंतु जेव्हा दुकानमालकाने मोबाईल मोजले तेव्हा त्याला यातील एक महागडा मोबाईल नसल्याचे समोर आले. त्याने दुकानातील सीसीटीव्ही तपासले असता त्याच्या समोर ही संपूर्ण चोरी समोर आली.

याप्रकरणी दुकान मालकाने नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून पोलीस या टोळीचा शोध घेत आहेत.