मुंबई : कॉलेज तरुण-तरुणींच्या आकर्षणाचं केंद्र ठरलेला शिवाजी पार्कातील सेल्फी पॉईंट अखेर बंद झाल आहे. महापालिका निवडणुकीतल्या पराभवानंतर मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कातील सेल्फी पॉईंट बंद केला आहे.
मुंबईतल्या या पहिल्या सेल्फी पाँईंटला तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत होता. पण देखभालीसाठी सीएसआर फंड उपलब्ध होणं कठीण असल्यानं हा सेल्फी पॉईंट बंद केल्याचं मनसेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. सेल्फी पॉईंट बंद झाल्यानं तरुणाईचा हिरमोड झाल्याचं चित्र आहे.
मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे हे शिवाजी पार्क भागात नगरसेवक असताना सेल्फी पॉईंट सुरु करण्यात आला होता. मुंबईतील पहिलाच अशाप्रकारचा सेल्फी पॉईंट असल्याने तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, यावेळी संदीप देशपांडेच्या पत्नी स्वप्ना देशपांडे या शिवाजी पार्कातून नगरसेवकपदासाठी उभ्या होत्या. मात्र, शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी त्यांचा पराभव केला. त्यांनंतर अगदी काही दिवसातच संदीप देशपांडे यांनी देखभालीसाठी निधी उपलब्ध होत असल्याचं कारण देत सेल्फी पॉईंट बंद केला आहे.