मुंबई: गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वांच्या नजरा मुंबई महापालिकेच्या महापौरपदाकडे लागल्या आहेत. कोणत्या पक्षाचा महापौर होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.


सध्याच्या महापालिकेची मुदत 8 मार्चला संपत आहे. त्यामुळे 9 मार्चला नव्या महापौरांची नियुक्ती होणं आवश्यक आहे.

मुंबईत मनपा निवडणुकीत शिवसेनेला 84, भाजपला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादी काँग्रेसला 9, मनसेला 7, समाजवादी पक्षाला 6, MIM 2 आणि अपक्षांना 6 जागा मिळाल्या आहेत.

कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने, सध्या शिवसेना-भाजप या प्रमुख विरोधी पक्षात चुरस पाहायला मिळत आहे.

मात्र महापौर निवड नेमकी होते कशी? त्याबाबतचा हा आढावा.

सर्वात आधी महापालिका आयुक्त राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार एक तारीख घोषित करतात.

आयुक्तांनी घोषित केलेल्या तारखेला सभा बोलवली जाते. त्या सभेत वरिष्ठ नगरसेवक किंवा विद्यमान महापौर यापैकी एकाचं नाव त्या सभेपुरतं अध्यक्ष म्हणून निवडलं जातं.

त्या नगरसेवकाच्या अध्यक्षतेखाली निवडणुका होतात. महापौरपदासाठी ज्या पक्षांनी अर्ज दाखल केलेले असतात, त्यापैकी सर्व अर्ज कायम राहिले, तर निवडणूक होते.

हे मतदान महापालिकेच्या सभागृहात हात वर करुन होतं. यावेळी ज्या उमेदवाराला जास्त मतं मिळतील, तो महापौर  होतो.

मुंबईचा महापौर आणि मॅजिक फिगर

 मुंबईच्या महापौरपदासाठी निवडणुकीपासून आपण ऐकत आलो आहोत ती म्हणजे 114 ही मॅजिक फिगर. 227 नगरसेवकांची संख्या असलेल्या या महापालिकेत 114 हा बहुमताचा आकडा पार करेल, त्या पक्षाचा महापौर होतो. मात्र कोणालाच हा आकडा गाठता न आल्याने, या आकड्याबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे.

मात्र महापौरपदासाठी 114 हा आकडा गाठण्याची गरज नाही, तर महापौर निवडणुकीवेळी सभागृहात उपस्थित असलेल्या सभासद संख्येपैकी, सर्वाधिक मतं ज्या उमेदवाराला मिळेल, तो महापौर होईल.

आकडे शिवसेनेच्या बाजूने?

सध्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये शिवसेनेचं संख्याबळ जास्त आहे. शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले आहेत. त्याशिवाय आणखी 5 अपक्ष आणि अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांनीही पाठिंबा दिल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

दुसरीकडे भाजपचे 82 नगरसेवक असल्यामुळे शिवसेनेला खरी स्पर्धा भाजपची आहे. तसंच एका अपक्षाने साथ दिल्याचा दावा भाजपने केला आहे.

महापौर लढत आणि शक्यता

 शक्यता 1 

समजा, महापौर निवडीवेळी सर्व 227 नगरसेवक उपस्थित राहिले. अशावेळी शिवसेना आणि भाजपने महापौरपदासाठी उमेदवार दिले. तर काँग्रेस (31), राष्ट्रवादी (9), मनसे (7) आणि MIM (2) यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असेल.

*शिवसेनेच्या उमेदवाराला शिवसेनेचे 84 + अपक्ष 5 + गीता गवळी = 90 अशी हुकमी मतं मिळतील.

*भाजपला तूर्तास त्यांच्या सर्व नगरसेवकांची म्हणजे 82 मतं मिळतील असं समजू.

*त्यामुळे राहिलेली काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि MIM ची मतं निर्णायक ठरतील. ही मतं ज्यांना मिळतील, त्यांचा महापौर होईल. त्यासाठी 114 आकडा गाठण्याची गरज नाही.

 शक्यता 2) - काँग्रेस तटस्थ राहिल्यास?

काँग्रेसचे 31 नगरसेवक जर महापौर निवडीवेळ तटस्थ राहिले किंवा सभात्याग केल्यास, सत्तेपर्यंत पोहोचण्याचा आकडा खाली येईल. त्यामुळे शिवसेनेला त्याचा फायदा होऊ शकतो.

कारण - 227 मधून 31 वजा केल्यास उपस्थितांची संख्या 196 होते, त्यामुळे बहुमताचा आकडा 99 वर येईल. मात्र हा आकडा गाठण्याचं बंधन नसेल, सर्वाधिक मतं मिळवावी लागतील. पण शिवसेनेच्या सोबतीला मनसे आली, तर शिवसेना 90+7 = 97 म्हणजे बहुमताच्या काठाला पोहोचेल.

शक्यता 3)  भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास?

भाजपचे 82 आणि राष्ट्रवादीचे 9 नगरसेवक एकत्र आल्यास, भाजपला फायदा होऊ शकतो. कारण शिवसेनेचे 84+अपक्ष 6  म्हणजे 90 असतील. त्यामुळे भाजप महापौरपदावर दावा करु शकतं.

 शक्यता 4) शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यास?

सध्या चाललेल्या राजकीय चर्चा, शिवसेना-भाजपमधील वाद पाहता, शिवसेना-काँग्रेस यांची आघाडी होईल, असं म्हटलं जात आहे. ही शक्यताही गृहित धरल्यास, शिवसेना 90+ काँग्रेस 31 =121 असं स्पष्ट बहुमत मिळू शकतं. 

शक्यता 5) शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास? 

शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास 90+7 = 97 असं संख्याबळ होईल. त्यामुळे शिवसेना महापौरपदाच्या आणखी जवळ जाईल.

 शक्यता 6) शिवसेना-भाजप व्यतिरिक्त कोणीच उपस्थित नसेल तर?

 शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरपदाच्या निवडणुकीत सहभाग न घेतल्यास, शिवसेनेचं संख्याबळ जास्त असल्याने, त्यांचा महापौर होईल.

शिवसेनेने कोकण आयुक्तांकडे अपक्षांसह गटाची नोंदणी केली आहे. त्यामुळे शिवसेनेची ही मतं फुटू शकत नाहीत.

शक्यता 7) विधानसभेची पुनरावृत्ती

विधानसभेत बहुमत सिद्ध करताना ज्याप्रमाणे भाजपने राष्ट्रवादीच्या बाहेरुन पाठिंब्याने सरकार स्थापन केलं होतं, तसंच शिवसेना अन्य पक्षांच्या बाहेरुन पाठिंबा घेऊन महापौरपद मिळवू शकतं.

शक्यता 8) शिवसेनेविरोधात सर्वपक्षीय एकत्र

जर शिवसेनेविरोधात सर्वपक्षीय एकत्र आले, तर चित्र वेगळं होऊ शकतं. अशावेळी भाजपचं संख्याबळ जास्त असल्याने त्यांचा महापौर होऊ शकतो.

शक्यता 9) शिवसेना, भाजप विरुद्ध अन्य विरोधक

जर शिवसेना आणि भाजपनेविरोधात  उर्वरित विरोधकांनीही उमेदवार दिल्यास, अशावेळी ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतील, तो महापौर होईल.

संबंधित बातम्या

शिवसेनेसोबत युतीसाठी भाजपचं एक पाऊल पुढे?

भाजपची साथ सोडणार, आणखी एक अपक्ष शिवसेनेत?


मुंबईत युतीचाच महापौर होणार : चंद्रकात पाटील

..तर ती शिवसेनेची आत्महत्या ठरेल : जयंत पाटील