मुंबई : शिवसेनेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडला मनसे विरोध करण्याची शक्यता आहे. वरळी कोळीवाड्यातील कोळी बांधवांच्या वतीने राज ठाकरे आक्रमक पवित्रा घेण्याची चिन्हं आहेत. कोस्टल रोडच्या भूमीपूजनाचा मुहूर्त ठरला आहे. रविवारी म्हणजेच 16 डिसेंबरला दुपारी 4 वाजता 'अमरसन्स'ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोस्टल रोडचं भूमीपूजन होणार आहे. मात्र कोस्टल रोडला होणारा कोळ्यांचा विरोध पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच दिवशी सकाळी 9 वाजता वरळी कोळीवाड्याला भेट देणार आहेत. कोस्टल रोडबाबत सर्व परवानग्या मिळाल्यानंतर कामाला गती मिळाली. मात्र शिवसेनेच्या या ड्रीम प्रोजेक्टसमोरच्या अडचणी संपलेल्या नाहीत. वरळी कोळीवाड्यातील स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. कोळीवाड्यातील कोळी बांधव काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंकडे आपलं गाऱ्हाणं घेऊन गेले होते. वरळी कोळीवाडा हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. परंतु कोस्टल रोडमुळे ही व्होट बँक शिवसेनेपासून दूर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोस्टल रोडवरुन मनसे-शिवसेनेत राजकारण तापणार, असंच चित्र आहे.