मुंबई : मुंबईच्या राणीच्या बागेत आणलेल्या पेग्विनवरुन आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. दक्षिण कोरियातून आणलेल्या या पेंग्विनला मनसे आणि काँग्रेसनं विरोध केला आहे.
कुणाचा तरी बालहट्ट पुरवायचा म्हणून पेंग्विनसाठी कोटींचा खर्च महापालिकेनं का उचलायचा? असा सवाल करत आदित्य ठाकरेंवर मनसेनं टीका केली आहे. तर काँग्रेसचे आमदार नितेश राणेंनीही बालहट्टापायी अवास्तव खर्च सुरु असल्याचं म्हटलं आहे.
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी राणीच्या बागेत पेंग्विन आणण्याची कल्पना आणली. पेंग्विन्सच्या देखभालीसाठी नेमलेल्या ऑस्टेलियन एजन्सीला 8 कोटींचं कंत्राट देण्यात आलं आहे. तसंच पेंग्विनसाठी आवश्यक व्यवस्था उभारण्यासाठी 7 ते 8 कोटी असा एकूण 14 ते 15 कोटी खर्च होतो आहे.