मुंबई : सरकारच्या हेल्मेटसक्तीच्या धोरणाविरोधात फामपेडाने आक्रमक निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेल खरेदी 1 ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ पेट्रोल डिलर्स असोसिएशनने घेतला आहे. फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी याबाबत माहिती दिली.
सरकारच्या ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ धोरण राबवताना पेट्रोल पंप चालकांना ग्राहकांचा होणारा विरोध लक्षात घेता, हा वाद टाळण्यासाठी पेट्रोल, डिझेल खरेदीच बंद करुन विरोध दर्शवण्याचं फामपेडाने ठरवलं आहे.
हेल्मेटसक्तीच्या कायद्याला आमचा विरोध नाही. मात्र, कायद्याची अंमलबजावणीदरम्यान होणाऱ्या अडचणींना विरोध असल्याचेही फामपेडाकडून सांगण्यात आले आहे.
“कायदा पाळला, तर पब्लिकडून मारहाणीची भीती असते आणि कायदा न पाळल्यास सरकारकडून गुन्हे दाखल होणार आहेत, अशा अडचणीत आम्ही सापडलो आहे. सरकारचा हेल्मेटसक्तीचा निर्णय जनतेच्या हिताचाच आहे. मात्र, अंमलबजावणीदरम्यान आम्हाला त्रास सहन करावा लागतो.”, असे फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.