नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाजरं कुरिअर करुन मनसेने आपला विरोध व्यक्त केला आहे.


गाजरं कुरिअर करत मनसेने मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक पत्रही पाठवलं आहे. ज्यामधून मुंढेंच्या बदलीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंढेंची बदली करुन मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईकरांच्या भावना दुखावल्याचं मनसेने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी राजकीय बळी देऊन सर्वसामान्य नवी मुंबईकरांचा रोष ओढवून भावना दुखावल्या आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईत त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा पाढा मनसेने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात वाचला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना कुरिअरच्या माध्यमातून गाजरं पाठवली आहेत.

https://twitter.com/mnsadhikrut/status/845662216615477248

नवी मुंबईत पाण्याची होत असलेली चोरी थांबवणे, मनपा प्रशासनाला शिस्त लावणे, विविध 23 दाखले मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे, कित्येक नगरसेवकांची अनधिकृत बांधकामे पाडणे, भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन करणे, वॉक विथ कमिशनरच्या माध्यमातून सर्वसामान्य नवी मुंबईकरांशी संवाद साधणे, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून पदपथ मोकळे करणे, महसुली उत्पन्न वाढविणे, वादग्रस्त टेंडर्स रद्द करून मनपाचे 400 कोटी रुपये वाचविणे अशा एक ना अनेक कामांमुळे आयुक्त तुकाराम मुंढे सर्व सामान्य नवी मुंबईकरांच्या पसंतीस उतरले होते.