मुंबई : मुंबईतील अनेक भागात पाणी साचल्यानंतरही 'मुंबई तुंबली नाही' असा दावा केल्यामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यातच आता मनसेने महापौरांना जाड भिंगाचा चष्मा पाठवून सूचक निषेध व्यक्त केला आहे.

महाडेश्वर यांना मुंबईतील परिस्थिती दिसावी म्हणून त्यांना जाड भिंगाचा चष्मा कुरियरने पाठवत असल्याचं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितलं. त्यांना नीट दिसत नसावं. म्हणून महापौरांसाठी खास जाड भिंगाचा चष्मा आणला आहे. या चष्म्यातून तरी त्यांना नीट दिसावं, अशी अपेक्षा मनसेकडून व्यक्त करण्यात आली. मनसेने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करुन याबाबत माहिती दिली.

महापौर महाडेश्वर यांना मुंबईत तुंबलेलं पाणी आणि लोकांना झालेला त्रास दिसलाच नाही. मुंबईतील कित्येक भागात पाणी तुंबले असताना महाडेश्वर म्हणतात की, मुंबईमध्ये कुठेच पाणी तुंबलेले नाही. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांना दिसण्याचा प्रॉब्लेम असावा. म्हणून खास महापौरांसाठी हा जाड भिंगाचा चष्मा आणला आहे. या चष्म्यातून तरी महापौरांना दिसावं, अशी आमची अपेक्षा असल्याचं देशपांडे म्हणाले.




महापौरांना तुंबलेली मुंबई दिसेना

अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं असलं तरी मुंबई कुठे तुंबली आहे? असा उलट प्रश्न मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर विचारत आहेत. नालेसफाईची कामं चांगली झाली आहेत. काही तुरळक ठिकाणी पाणी साचलं आहे. या व्यतिरिक्त मुंबई सुरळीतच आहे, कुठेही तुंबलेली नाही, असा दावाही त्यांनी केला.

महापालिका उपआयुक्तांनीही महापौरांची री ओढत मुंबई तुंबली नसल्याचा दावा केला. फक्त काही ठिकाणी पाणी जमा झालं आहे. प्रसारमाध्यमांच्या पाणी तुंबण्याच्या व्याख्या चुकीच्या असल्याचं मुंबई उपआयुक्तांचं म्हणणं आहे. सखल प्रदेशात पाणी साचतंच, असंही ते सांगायला विसरले नाहीत.