मुंबई : विरोधी पक्ष नेता म्हणून मी कायम पुराव्यांसह आरोप केले. कारण बिनबुडाच्या आरोपाने काय वेदना होतात हे मला माहिती आहे, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारला शालजोडे लगावले. आपल्यावर झालेल्या आरोपांचं स्पष्टीकरण देताना खडसेंनी विधानसभेत तूफान फटकेबाजी केली. खोटे आरोप करणाऱ्यालाही शिक्षा करण्याबाबत कायदा करा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली.


माझ्या जीवनात मी एकही निवडणूक हरलो नाही. चाळीस वर्षात एकही आरोप सिद्ध झालेला नाही. आरोप-प्रत्यारोप सभागृहात होत राहणार. पण विरोधी पक्ष नेता म्हणून मी कायम पुराव्यांसह आरोप केले. कारण बिनबुडाच्या आरोपाने काय वेदना होतात हे मला माहिती आहे, असं खडसे म्हणाले.

288 आमदारांपैकी भ्रष्ट आणि नालायक आमदार म्हणून मी आज आहे उभा आहे. सभागृहातील विरोधक आणि सत्ताधारी आमदारांपैकी कोणीही नाही, पण बाहेरच्या व्यक्तीने माझ्यावर आरोप केले. दाऊदच्या बायकोशी मी बोलत असल्याचे संबंध जोडले गेले, असं सांगताना
दाऊदला सोडून तिला नाथाभाऊशी का बोलावं वाटलं, हे मला कळलंच नाही. एटीएस आणि इतर यंत्रणांनी केलेल्या चौकशीत काहीच सिद्ध झालं नाही, हे कळल्यावर मला आणि माझ्या बायकोला दोघांनाही बरं वाटलं, अशी मिश्किल टिपणीही खडसेंनी केली.

खडसे आपल्यावर झालेल्या आरोपांचं स्पष्टीकरण देताना भावनिक झाले होते. एकही इंच जमीन घेतली नसताना, सर्व नियमांचं पालन करुनही माजी न्यायमूर्ती झोटिंग यांची समिती नेमली गेली. अँटी करप्शनकडून दोनदा चौकशी झाली, इन्कम टॅक्सची घरी धाड पडली. माझ्या बायका-पोरांना चौकशीसाठी नेण्यात आलं. मी जमीनदाराचा मुलगा आहे. शेतीव्यतिरिक्त माझा एकही उद्योग नाही. संपूर्ण प्रॉपर्टीची चौकशी करुन एकही अपसंपदा नाही, असं चौकशीतून स्पष्ट झालं. एकही शैक्षणिक संस्था नाही कारण डोनेशन घेण्याचा कधी दमच नव्हता, असं खडसेंनी सांगितलं.

मी शेवटच्या दिवशी यासाठी उभा आहे कारण हा भ्रष्ट, नालायक, चोर उचक्का सदस्य म्हणून या सभागृहातून मला जायचं नाही. सभागृहाला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की हा डाग मला घेऊन जायची संधी देऊ नका. खोटे आरोप करणाऱ्यालाही शिक्षा करण्याबाबत कायदा करा, आरोप करुन एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना शिक्षा करा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली.

विनापुरावे आरोप करणारा व्यक्ती आज घरी आहे. काय न्याय आहे या राज्यात? कोणाच्या जीवनात असा प्रसंग येऊ नये. यापेक्षा वाईट कोणाच्या जीवनात काही होऊ शकेल असे वाटत नाही. काही चुकीचं बोललो असेल तर सर्वांची क्षमा मागतो, असं म्हणत खडसेंनी भाषण आटोपतं घेतलं.