ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ठाण्यातील 9 एप्रिलला होणारी सभा आता 12 एप्रिलला होणार आहे. या सभेवरुन आणि ठिकाणावरून वाद निर्माण झाल्याने आता ही सभा 12 एप्रिलला होणार आहे. ही सभा ठाण्यातील तलावपाळी या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. 


राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेच्या ठिकाणावरुन वाद निर्माण झाला होता. गेल्या वेळी गडकरी रंगायतनजवळ राज ठाकरेंची सभा झाली होती. या वेळी त्याला लागून असलेल्या तलावपाळी या ठिकाणी ही सभा घेणाचा प्रस्ताव मनसेकडून पोलिसांना देण्यात आला होता. पण या ठिकाणी 9 तारखेला होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे ही सभा आता 12 तारखेला होणार असल्याची माहिती मनसेच्या वतीने देण्यात आली आहे. 


चैत्र नवरात्री सुरू आहेत. त्यामुळे यावेळी अनेकजण देवीच्या दर्शनाला बाहेर पडतात. त्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवरात्री झाल्यानंतर ही सभा 12 तारखेला संध्याकाळी 6 वाजता तलावपाळी या ठिकाणी होणार आहे. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणावर उलटसुलट चर्चा अजूनही सुरु आहे. त्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे, मदरशांमधले गैरप्रकार यावर भाष्य केलं होतं. तसेच महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर चौफेर हल्ला चढवला होता. 


गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्याची कास धरल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच त्यांनी मशिदींवरील भोंग्याच्या विषयाला हात घातला. आता 12 तारखेच्या ठाण्यातील सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


महत्वाच्या बातम्या: