मुंबई: वर्षानुवर्षे सेवा दिलेल्या कामगारांच्या मुलांना सेवेत कायम करून देण्यासाठी उद्याच लेबर प्रतिनिधींशी चर्चा केली जाईल आणि त्यातून मार्ग काढण्यात येईल असं आश्वासन बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलं. काही मुलांना सेवेत कायम करण्यात आलं आहे, पण इतर मुलांवर अद्याप निर्णय होत नसल्याने कुलाबा बेस्ट भवन येथे मनसेने ठिय्या आंदोलन (MNS Protest At Colaba BEST Office) केलं. त्यानंतर प्रशासनाने त्यांची भेट घेत त्यावर सविस्तर चर्चा करण्याचं मान्य केलं आहे.
मुंबईच्या बेस्ट उपक्रमामध्ये वर्षानुवर्ष सेवा दिलेल्या कामगारांच्या मुलांना कॅज्युअल लेबर म्हणून भरती करण्यात आले होते. मनसेच्या पाठपुरवठ्याने या कामगारांना सेवेत कायम करून घेण्याचे मान्य झाले होते. त्यानुसार 30 कामगारांना सेवेत रुजू देखील करून घेण्यात आले. परंतु इतर सर्व कामगार अद्याप कायमस्वरूपी नोकरीच्या प्रतीक्षेत असल्याने येत्या 15 तारखेपासून ते कामगार उपोषणाला बसणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मनसेच्या बेस्ट कामगार कर्मचारी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बेस्ट भवनाला धडक दिली. त्यांनी आयएएस अधिकारी विजय सिंघल, जनरल मॅनेजर यांच्या दालनाबाहेर ठिय्या करत त्यांच्या बैठकीची मागणी केली.
विजय सिंघल यांनी मनसेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करत येत्या आठवड्यात सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करू असे आश्वासन दिले. कॅज्युअल लेबर यांच्या प्रतिनिधींना उद्याच बेस्ट भवनामध्ये बोलावून त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असे देखील आश्वासन दिले.
अविनाश जाधव यांच्यासह 12 कार्यकर्त्यांची सुटका
मुलुंड टोलनाका (Mulund Toll) तोडफोडप्रकरणी मनसे (MNS) कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली आहे. अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यासह 12 कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांकडून सुटका झाल्यानंतर अविनाश जाधव यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेण्यासाठी मनसे तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता गांधीगिरी आंदोलन केले मात्र यापुढे आता गांधीगिरी आंदोलन होणार नाही, मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.
अविनाश जाधव यांच्यासह दहा ते बारा कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर नवघर पोलीस ठाण्यात बाळा नांदगावकर ,संदीप देशपांडे, अभिजीत पानसे,रिटाताई गुप्ता यांनी पोलीस ठाण्यात पोलिसांशी संवाद साधत कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. राज ठाकरे यांचे विधीतज्ञ मुंबई उच्च न्यायालयाचे वकील राजन शिरोडकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची जामीन प्रक्रिया पूर्ण करून कार्यकर्त्यांची सुटका केली आहे.
ही बातमी वाचा: