Rohit Pawar On Tejaswini Pandit : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) टोलवाढीविरोधात ट्वीट केलं त्यानंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. अभिनेत्रीने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एक व्हिडीओ शेअर करत टोलचे पैसे कुणाच्या खिशात जातात? असा प्रश्न उपस्थित केला. पुढे अभिनेत्रीच्या अकाऊंटची ब्लू टिक हटवण्यात आली. त्यानंतर तिने पुन्हा एक खास पोस्ट शेअर करत याप्रकरणावर भाष्य केलं. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीदेखील कुणाकुणाचा आवाज दाबणार असं म्हणत सत्ताधाऱ्यांना सवाल केला आहे.
कुणाकुणाचा आवाज दाबणार? रोहित पवार यांचा सवाल
तेजस्विनी पंडितचं ट्वीट शेअर करत रोहित पवार यांनी लिहिलं आहे,"विरोधात व्हिडिओ टाकला म्हणून ट्रोल गँग वापरून ट्रोल करायचं, ट्विटरची ब्लू टिक काढायची, हे अत्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण आहे. अशाप्रकारे कुणाकुणाचा आवाज दाबणार?".
रोहित पवार यांनी पुढे लिहिलं आहे,"इतका कपटीपणा योग्य नाही. प्रत्येकाला विचारधारेचं, आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि मुलभूत अधिकारही आहे, परंतु सत्तेचा गैरवापर करून आपण हा मुलभूत अधिकारही हिरावून घेणार का?", असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
तेजस्विनी पंडितचं ट्वीट काय होतं? (Tejaswini Pandit Tweet)
तेजस्विनी पंडितने ट्वीट केलं आहे,"कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही! माझ्या X (ट्विटर) अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं, कारण का तर मी एक ‘आम्हा जनतेची' इतकी वर्ष फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून?".
तेजस्विनी पुढे म्हणते,"X (ट्विटर) अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात त्याबद्दल धन्यवाद. पण या बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही. सामान्यांचा आवाज बंद करणे हाच यांचा बहुदा एकमात्र 'X' फॅक्टर आहे हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा 'जय हिंद जय महाराष्ट्र'साठीचा घोष योग्य वेळी सुरूच राहील. सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत! जेव्हा जेव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदुमणारच आहे. जय हिंद जय महाराष्ट्र!".
संबंधित बातम्या