मुंबई : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेचं फेरीवाल्यांविरोधातील आंदोलन पुन्हा सुरु केलं आहे. यावेळी मनसेनं मुंबई महापालिकेच्या महापौरांच्या वॉर्डमध्येच फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केलं आहे. कालच अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता.


राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज सांताक्रूज पूर्वेकडील रेल्वे स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केलं. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या प्रभागातील फेरीवाल्यांना मनसैनिकांनी पिटाळून लावलं. यावेळी मनसे उपविभागाध्यक्ष अखिल चित्रे आणि शाखाध्यक्ष संदेश गायकवाड यांची स्थानिक वाकोला पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसोबत वादावादीही झाली.


काल राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांची भेट घेतली. या भेटीमध्ये फेरीवाले यांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली होती. अनधिकृत फेरीवाल्यांना प्रशासकीय अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता.


रेल्वे स्टेशनच्या दीडशे मीटर जागेत फेरीवाले बसणार नाही, हे स्पष्ट असतानाही अधिकारी फेरीवाल्यांकडून पैसे घेऊन त्यांना बसवतात, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. अशा अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांना केलं होतं. तसेच कारवाई न केल्यास मनसे स्टाईल कारवाई होईल, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला होता.