वसई : वसईत गुजराती पाट्यांच्या विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या ढाब्यांच्या गुजराती भाषेत असलेल्या पाट्या मनसेनं काढायला लावल्या आहेत.
या मार्गावरील काठीयावाडी धाबा मालकानं गुजराती भाषेत भला मोठा बोर्ड लावला होता. याआधीही मनसेनं गुजराती पाट्या काढायला लावल्या होत्या. मात्र, या ढाबा मालकांनी पुन्हा गुजराती पाट्या लावल्यानं नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, काल (मंगळवार) वसईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभाही पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतियांच्या मुद्दवरुन भाजप सरकारवर निशाणा साधला.
"बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई गुजरातला देण्यासाठीचे कारस्थान आहे. बुलेट ट्रेनच्या नावाखाली महाराष्ट्रातल्या जमिनी बळकावायच्या आणि 1960 साली जी मुंबई महाराष्ट्राला दीर्घ लढाईने मिळवली तिचा ताबा घ्यायचा हा यांचा डाव आहे." अशा शब्दात राज ठाकरेंनी मोदींवर टीका केली.
"नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत तर गुजरातचे पंतप्रधान आहेत. प्रत्येक गोष्टीत त्यांना अजून देखील गुजरात आठवतो. जर पंतप्रधान होऊन देखील मोदी गुजरातला विसरू शकत नाही तर मग महाराष्ट्रावर प्रेम करणारा राज ठाकरे संकुचित कसा?" असा सवालही राज ठाकरेंनी यावेळी केला.
संबंधित बातम्या :
बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका, राज ठाकरेंचं आवाहन